रंगकर्मीपण अखेरपर्यंत टिकवून ठेवेन- चंद्रकांत कुलकर्णी

By admin | Published: March 30, 2017 07:10 AM2017-03-30T07:10:35+5:302017-03-30T07:10:35+5:30

मुंबईने मला नाव दिले, माझ्या कामाला वेग दिला. मुंबईत येऊन २९ वर्षांचा काळ लोटला. या काळात भले मी माध्यमांतर केले. जाहिरात असो वा सिनेमा सर्व

Chandrakant Kulkarni will keep the color artist alive till now | रंगकर्मीपण अखेरपर्यंत टिकवून ठेवेन- चंद्रकांत कुलकर्णी

रंगकर्मीपण अखेरपर्यंत टिकवून ठेवेन- चंद्रकांत कुलकर्णी

Next

 मुंबई : मुंबईने मला नाव दिले, माझ्या कामाला वेग दिला. मुंबईत येऊन २९ वर्षांचा काळ लोटला. या काळात भले मी माध्यमांतर केले. जाहिरात असो वा सिनेमा सर्व क्षेत्रांत काम केले. सिनेमासाठी काम केले, तरी मी मूळचा रंगभूमीचा माणूस आहे. पण मी अर्थार्जनासाठी कधीही तडजोड केली नाही आणि करणार नाही. त्यामुळे रंगकर्मीपण अखेरपर्यंत टिकवून ठेवेन, अशी कृतज्ञतापूर्वक भावना ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
चैत्र चाहूलतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘रंगकर्मी सन्मान’ आणि ‘ध्यास सन्मान’ या दोन्ही पुरस्कारांचे वितरण मंगळवारी शानदार समारंभात करण्यात आले. चैत्र चाहूलतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या या विशेष पुरस्कारांचे यंदाचे १२वे वर्ष आहे. ‘चैत्र चाहूल’चा रंगकर्मी सन्मान ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर नाडकर्णी यांच्या हस्ते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी, गतिमंद मुलांसाठी बालनाट्य चळवळ चालवणाऱ्या कांचन सोनटक्के यांना ध्यास सन्मान प्रदान करण्यात आला. २५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कर्णबधिर, अपंग मुलांसाठी सुरू केलेली नाट्य चळवळ म्हणजे आयुष्याचा ध्यास असल्याच्या भावना कांचन सोनटक्के यांनी व्यक्त केल्या. या पुरस्काराने कामाची उमेद वाढली आहे आणि पुढे कार्य करण्याचा ध्यासही वाढला आहे, असेही कांचन सोनटक्के यांनी सांगितले. नाटकाचा वापर थेरपी म्हणून करणाऱ्या सोनटक्केबाई आगळ्याच आहेत. त्यांचे कार्य चकित करणारे आहे. त्यांनी नाटकांतून अपंगांमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास जवळून बघितला आहे, असे कमलाकर नाडकर्णी यांनी सांगितले. आगामी वर्षभरात चंद्रकांत कुलकर्णी यांनी एक प्रायोगिक तर सोनटक्के यांनी गतिमंद मुलांच्या समस्यांवर नाटक सादर करावे, अशी अपेक्षा नाडकर्णी यांनी व्यक्त केली. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के यांच्या हस्ते शफाअत खान आणि प्रदीप मुळ्ये यांना संगीत अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गौरविण्यात आले. या वेळी महर्षी दयानंद महाविद्यालयाने सादर केलेली ‘दप्तर’ एकांकिका सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या अखेरीस शौनक अभिषेकी यांच्या सुमधुर सुरांची मैफील रसिकांना अनुभवता आली. (प्रतिनिधी)

Web Title: Chandrakant Kulkarni will keep the color artist alive till now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.