मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना लगावला होता. त्यानंतर, चंद्रकांत पाटील यांनी त्याच्यावर संजय राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांना थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच केलंय. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या खळबळजनक राजकीय वक्तव्याने चर्चेला उधाण आलं आहे.
चंद्रकात पाटील आणि रावसाहेब दानवे पाटील हे कदाचित भाजप पक्ष सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता असेल. अलिकडेच शिवसेनेत काही गडबड चालू होती, काही नेते शिवसेनेत येत असल्याचं समजतयं. मग, कदाचित रावसाहेब दानवे पाटील आणि चंद्रकांत पाटील हेच प्रमुख नेते असतील. त्यामुळेच, मुख्यमंत्र्यांचं ते सूचक विधान महत्त्वाचं आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. आता, भाजपाकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
केंद्रात मंत्रीपद देणार असतील - अजित पवार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केंद्रामध्ये मंत्री करणार असतील तर मला माहीत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये 'मला माजी मंत्री म्हणू नका. येत्या तीन-चार दिवसांत काय ते तुम्हाला दिसून येईल,' असे वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्क लढविले जात आहेत
चंद्रकांत पाटील यांचा राऊतांवर पलटवार
संजय राऊत यांच्या विनोदी टीकेला, चंद्रकांत पाटील यांनीही विनोदी शैलीतच उत्तर दिलंय. संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर पलटवार केला. तसेच, संजय राऊतांना कोणी फार गंभीरतेनं घेत नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला. या दोन्ही नेत्यांमधील शाब्दीक वाद चर्चेचा विषय बनला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत
"चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. चंद्रकांतदादा हे अवतारी पुरूष आहेत. चमत्कारी पुरूष आहेत. ते काहीतरी नक्कीच चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना मी समजू शकतो. मी त्यांना निरोप पाठवला आहे. तुम्हाला २५ वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावं लागणार आहे. कारण, उद्धवजींच्या नेतृत्त्वात राज्यातील सरकार कायम राहणार आहे. त्यामुळे पाटील यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं मला कळालं आहे. त्यामुळे त्यांना माजी मंत्री म्हणून घ्यायचं नसेल", असं संजय राऊत म्हणाले.