मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात विविध उपक्रमांनी शरद पवार यांच्या कार्याची महती सांगण्यात येत आहे. तसेच, विविध उपक्रमाद्वारे राज्यात विधायक कामे केली जात आहेत. देशभरातून शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोनवरुन शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही शुभेच्छा दिल्या. आता, भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवाराना वाढदिवसांच्या शुभेच्छा देताना त्यांच्या कामाचं कौतुक केलंय.
राजकारणात मतभेद अनेकदा असतात, पण मनभेद कधीच नसतात. भिन्न विचारांच्या पण सर्वांनाचा मार्गदर्शक असलेल्या शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांना राजकारणाचा तब्बल 50 वर्षांचा अनुभव असून राज्याच्या हितासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. स्थानिक स्वराज संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण देऊन शासन प्रक्रियेत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय शरद पवार यांनीच घेतला, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे कौतुक केलंय. देशाचे कृषी मंत्री असताना शेती व दुग्ध उत्पादन क्षेत्रात त्यांनी वाखाणण्याजोगे काम केले. शेतकऱ्यांना सर्व बंधनातून मुक्त करणाऱ्या सर्व गोष्टींना व विधेयकांना त्यांचा पाठिंबा राहिला आहे आणि पुढेही ते मिळेल,' असं सूचक आवाहनही पाटील यांनी केलंय. पाटील यांनी सध्याच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनुसरून असं आवाहन केलंय.