Join us

Maharashtra Assembly Winter Session 2021: “काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसावा”; भाजपचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 12:10 PM

उद्या रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुंबई: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे वाढते संकट आणि अन्य कारणांमुळे यंदाही हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये पार पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा मुलावरही बहुतेक विश्वास नसावा, अशी फिरकी चंद्रकांत पाटील यांनी घेतली. 

चंद्रकांत पाटील विधानभवनात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, राज्याचे पोलीस किती सक्षम आहेत ते दिसले. इतक्या मोठ्या प्रमाणात हा घोटाळा झाला असून, तो मंत्रालयापर्यंत येत आहे. एका मंत्र्याचे नाव अस्पष्टपणे यायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी महाराष्ट्र पोलीस कसा तपास करू शकणार? त्यामुळे सीबीआय तपासाची मागणी केली आहे. लोकशाहीत आम्हाला काही मागण्याचा तरी अधिकार आहे की नाही? की आमचे तोंड दाबून ठेवणार आहात, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली. 

मुख्यमंत्र्यांचा मुलावरही बहुतेक विश्वास नसावा

मुख्यमंत्री आजारी असल्याने गैरहजर असणे साहजिक आहे. पंरपरा ही आहे की कोणाला तरी पदभार द्यावा लागतो आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते. अन्य दोन पक्षांवर अविश्वास असे स्वाभाविक आहे. कारण पदभार घेतला तर सोडणार नाहीत. पण त्यांच्या पक्षातील कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार दिला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंकडे पदभार का देत नसावेत, असा प्रश्न विचारला असता, त्यांचा बहुतेक मुलावरही विश्वास नसावा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तसेच रश्मी वहिनींना चार्ज देऊन त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, स्वप्न तेव्हा पडते जेव्हा ते व्यवहारात येऊ शकत नसते. राष्ट्रपती राजवट येणे काही स्वप्न असून शकत नाही. राजवट येण्यासाठीची सर्व कारणे पूर्ण झाली आहेत. ती आणायची की नाही हा केंद्राचा विषय आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सामनातील टीकेला उत्तर देताना म्हटले. 

टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशनचंद्रकांत पाटीलउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेमहाविकास आघाडी