मुंबई: आताच्या घडीला महाराष्ट्रात विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आमदारांना घरे देण्याची घोषणा केली होती. यावरून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. सरकारच्या या निर्णायावरून भाजप नेत्यांनी निशाणा साधला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली असून, सरकार पडले या भीतीनेच आमदारांना घराचे आमीष दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच हा वर्षाव केला जात आहे. दोन कोटींचा आमदार निधी करोना असतानाही चार कोटी केला, आता पाच कोटी केला. ड्रायव्हरचे, सहाय्यकाचे पगार वाढवले. त्यात आता घरे दिली जाणार आहेत. कशासाठी घरे पाहिजेत, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
प्रत्येकाची चार चार घरे आहेत
माझे मुंबईत घर नाही. पण तरीही हे पैसे तुम्ही शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना द्या यासाठी मी आग्रही असेन. माझ्यासारखे आणि सदाभाऊ खोत यांच्यासारखे सोडले तर प्रत्येकाची चार चार घरे आहेत, क्षमता आहे. आमदार व्हा म्हणून कोणी नारळ, निमंत्रण दिले नव्हते की तुम्ही आमदार व्हा मग घर मिळेल, पाच कोटी मिळतील. त्यामुळे आमदारांचा रोष सहन करत मी हे योग्य नसल्याचे सांगत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सभागृहात आमदारांना मोफत घरे देणार असा निर्णय जाहीर केलात. निर्णयाला विरोध असण्याचा कारण नाही. मात्र या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात. देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थी पडणाऱ्या शहीद सैनिकांच्या लहान कच्चाबच्चांना, त्यांच्या म्हाताऱ्या आई-वडिलांना, त्यांच्या निराधार विधवा पत्नीला, ज्याच्या डोक्यावर छत नाही अशा कुटुंबांना अगोदर मोफत घरे देणार? की सरकार म्हणून आधी स्वत:चच भले म्हणत आमदारांना देणार, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.