मुंबई - भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर, कोल्हापुरात जाऊन या घोटाळ्याची तक्रार देणार असल्याचं सांगत किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेमधून कोल्हापूरला निघाले होते. मात्र, पोलिसांनी कराडमध्येच त्यांना स्थानबद्ध केलं. त्यामुळे, सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सहकारसह शरद पवारांवर निशाणा साधला. भाजपा नेत्यांनीही ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. आता, याबाबत शिवसेनेन मुखपत्रातून आपली भूमिका मांडली आहे.
'ईडी' शी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. 'ईडी' मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार 'केंद्रीय' जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे . भाजपचे माजी खासदार सोमय्या यांचे आरोप व बाता या नागपूरच्या गोटमारीसारख्याच आहेत, असे म्हणत शिवसेनेनं किरीट सोमय्यांच्या आरोपाला गंभीरतेनं घेत नसल्याचं म्हटलं आहे.
मुंबई लोकलमध्ये विषारी वायू सोडण्याचा अतिरेक्यांचा कट होता. पोलीस त्या तपासात गुंतले असतानाच विरोधी पक्ष राज्यात भलतेच प्रश्न निर्माण करून पोलिसांवरील ताण वाढवीत आहे. विरोधकांनी निर्माण केलेल्या दुर्गंधीमुळेही जनजीवन विस्कळीत होऊ शकेल. विरोधकांना राज्यातील जनतेच्या जिवाशी खेळायचे आहे काय? एकदा तसे जाहीर करा म्हणजे झाले, असा टोलाही शिवसेनेनं मुखपत्रातून लगावला आहे.
कोल्हापुरातून पळ काढला, कोथरुडलाही तोंडाला फेसच आला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ''ईडी'शी लढताना तोंडाला फेस येईल.'' पाटील यांना 'ईडी'चा इतका अनुभव कधीपासून आला? हसन मुश्रीफ यांच्यावर माजी खासदार सोमय्या यांनी काही आरोप केले आहेत. हे आरोप चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने केले असावेत अशी मुश्रीफ यांना खात्री आहे, कारण आरोप करणाऱ्या दोघांच्याही तोंडी 'ईडी'चे नाव आहे. मुश्रीफ हे मंत्री आहेत व कोल्हापुरात त्यांचे राजकीय वजन आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता.