ठरलं ! चंद्रकांत पाटील उद्याच 'राज'दरबारी, कृष्णकुंजवर झडणार 'चाय पे चर्चा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 09:37 PM2021-08-05T21:37:11+5:302021-08-05T21:38:20+5:30
राज ठाकरेंना भेटण्यासाठी उद्या सकाळी 11.30 वाजता कृष्णकुंजवर मी राज ठाकरेंना भेटायला जात आहे. ही सदिच्छा भेट असणार असून दोन राजकीय नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा होते, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला. त्यानंतर, चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार, आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्याच म्हणजे शुक्रवार 6 ऑगस्ट रोजी राज ठाकरेंना भेटणार आहेत.
राज ठाकरेंना भेटण्यासाठी उद्या सकाळी 11.30 वाजता कृष्णकुंजवर बंगल्यावर मी जात आहे. ही सदिच्छा भेट असणार असून दोन राजकीय नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा होते, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज ठाकरेंची परप्रांतीयांबाबतची भूमिका यासंदर्भात मी चर्चा करण्यासाठी त्यांना भेटणार आहे. सध्या युतीचा कुठलाही प्रस्ताव नाही, मी एकटा निर्णय करणारा नाही. आमच्याकडे तीन निर्णयकर्ते आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्यात चर्चा होणार असल्याचे समजते. मात्र, युतीचा कुठलाही प्रस्ताव नसून ही मैत्रीपूर्ण भेट आहे. उद्याच्या भेटीच विचारांचे आदान-प्रदान होणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
माझ्या भूमिका स्पष्ट असतात, मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होत. त्यानंतर, पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भाषणाची क्लीप मी ऐकली असून लवकरच राज यांची भेट घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होत. त्यानुसार, ही भेट होत आहे. मला भाषणाची क्लीप मिळाली, ती त्यांच्या सहकाऱ्याने पाठवली की कुणी हे मलाही माहिती नाही. पण, भाषणाच्या क्लिपची आणि त्यांच्या भूमिकेची आम्ही नक्कीच चर्चा करू. मी ती क्लीप शांतपणे ऐकली, त्यामध्ये उत्तर भारतीय पुरोहितांनीही राज यांचा सत्कार केला आहे. ही क्लीप पाहिल्यानंतर त्यातील मुद्द्यावर चर्चा करायची आहे, असे पाटील यांनी म्हटलं होतं.
राज ठाकरे यांची भूमिका
राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना १०० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेतली असताना त्यांनी ही भूमिका मांडली. भाजपसोबत मनसेची युती होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला होता. तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि आम्हाला उत्तर विचारता. मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही. मी बोललो होतो क्लिप पाठवेल. त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही, असे राज यांनी म्हटलं होतं.