Chandrakant Patil : काशीचा घाट म्हणजे मृत्यू, फडणवीसांबद्दलच्या त्या विधानावरुन संतापली भाजप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 05:18 PM2022-01-18T17:18:03+5:302022-01-18T17:46:47+5:30
काशीचा घाट म्हणजे मृत्यू... नाना पटोले म्हणतात मोदींना मारेन, नवाब मलिक म्हणतात यांना काशीचा घाट दाखवू, म्हणजे सगळं अंडरवर्ल्ड चाललंय की काय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत विधान करणारे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर शरद पवार काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिला होता. त्यावरुन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, काशीचा घाट म्हणजे मृत्यू... असेही पाटील यांनी अधोरेखित केले.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या विधानवरुन संताप व्यक्त केला आहे. काशीचा घाट म्हणजे मृत्यू... नाना पटोले म्हणतात मोदींना मारेन, नवाब मलिक म्हणतात यांना काशीचा घाट दाखवू, म्हणजे सगळं अंडरवर्ल्ड चाललंय की काय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ह्याला मारू, त्याला मारू, काय दहशतवाद चाललाय. देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षे पूर्णपणे मुख्यमंत्री कार्यकाळ केला आहे. वसंतरावाई नाईक यांच्यानंतर तेच एकमेव आहेत. सध्या ते विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना काशीचा घाट दाखविण्याची भाषा केली जात आहे.
भाजपच्या राज्यातील गावागावातील कार्यकर्त्यांनी प्रिकॉशनरी म्हणजे सावधगिरीचा कंप्लेंट नवाब मलिक यांच्याविरुद्ध केली पाहिजे. नवाब मलिक उघडपणे म्हणाले आहेत, की फडणवीसांना काशीचा घाट दाखवू. काशीचा घाट प्रसिद्ध आहे तो मृत्यूनंतर काशीच्या घाटावर अंत्यविधी झाल्यास त्याला स्वर्ग मिळतो, असे म्हणतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
काय म्हणाले होते मलिक
शरद पवार हे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात २५-३० जागा निवडून येत होत्या ते पवारसाहेबांवर भाष्य करत आहेत. याअगोदरही पवारसाहेबांवर फडणवीस भाष्य करत होते, त्यावेळी काय झाले, असे मलिक यांनी म्हटले. तसेच, शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर शरद पवार काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे मलिक यांनी म्हटले होते.