मुंबई - ‘हम डरेंगे नही, झुकेंगे नही, झुकाएंगे’ असे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दमदार बॅटिंग केली. केंद्र सरकार, ईडी, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडताना त्यांनी भरपूर सिनेस्टाईल डायलॉगही म्हटले आहे. राऊत यांच्या या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांनी हा फ्लॉप पिच्चर असल्याची टिका केली. भाजप नेत्यांनी त्यांच्यावर पलटवार केला. तर, मनसेनंही या पत्रकार परिषदेला टुकार असं संबोधलं आहे.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलंय. तर, गिरीश महाजन यांनी ही पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड निकला चुहा... अशी टीका केलीय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 'गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही फार मोठे प्रकरण बाहेर काढणार असल्याचा गाजावाजा करणाऱ्या संजय राऊत यांनी केला. पण, यांची पत्रकार परिषद म्हणजे 'खोदा पहाड निकला चुहा' असं झालं आहे. फक्त आरोप करून काही होत नाही, त्यासाठी पुरावेसुद्धा असावे लागतात, हे राऊतांना कळलं पाहिजे. अडचणीत आलेला माणूस थयथयाट करतो, संजय राऊतांचं तसंच झाल्याचंही, पाटील यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले सोमय्या
सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, २०१७ मध्ये राऊत यांनी माझ्यावर आणि माझी पत्नी मेधावर असेच आरोप केले होते. आता माझा मुलगा नील याचे नाव त्यांनी घेतले आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री तसेही माझ्याविरुद्ध खटले भरत आहेतच, त्यात पुन्हा एकाची भर. मी व माझ्या कुटुंबाने काहीही चुकीचे केलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राऊत हे कोविड सेंटरच्या घोटाळ्याचे जे आरोप मी केले त्यावर काहीच का बोलत नाहीत? संजय राऊत यांचे प्रवीण राऊत, सुजित पाटकर यांच्याशी काय संबंध आहेत?