मुंबई - देशात सध्या पाच राज्यांच्या विधआनसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही आता पाच पैकी तीन राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा करत रणशिंग फुंकलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी, समाजवादी आणि इतर पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून येथे परिवर्तन होणार, असे भाकितही पवारांनी केले. पवारांच्या या भाकितावरुन चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांची पत्रकार परिषद आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकांबाबत केलेल्या भाकितावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणारे शिवसेनेचे खा. संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे, अशा शब्दात पाटील यांनी दोन्ही नेत्यांवर बोचरी टीका केली.
काय म्हणाले शरद पवार
उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजवादी आणि इतर छोट्या पक्षांसोबर आघाडी करून निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच लवकरच उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार असल्याचंही पवार यांनी जाहीर केलं. विधानसभा निवडणुकीसाठीचा राष्ट्रवादीचा प्लान स्पष्ट करुन झाल्यानंतर पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली. तसेच, उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार असल्याचं भाकितही पवारांनी केलं. ''गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमधील चित्र बदलले आहे. उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार आहे, अशी चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशमधील जनतेलाही बदल हवा आहे. मी काल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकलं. त्यांनी उत्तर प्रदेशातील ८० टक्के जनता आपल्यासोबत आहे आणि केवळ २० टक्के जनता विरोधात आहे असं म्हटलं. ते २० टक्के नागरिक कोण? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. ते नेमकं कोणाबद्दल बोलत होते? राज्याचा मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो तो कोण्या एका गटाचा नसतो, असे म्हणत पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रहार केला.