मारुतीराया चंद्रकांत पाटलांची घेणार भेट; आव्हाडांनी सांगितलं काय होणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 10:27 AM2023-01-14T10:27:05+5:302023-01-14T10:28:10+5:30
पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसा निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
मुंबई - भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या काही ना काही विधानांमुळे चर्चेत असतात. मध्यतंरी शाईफेकीच्या घटनेनंतर ते काहीसे अलिप्त दिसले. मात्र, आता पुन्हा एका विधानामुळे ते चर्चेत आले आहेत. आपला कुठलाही देव आणि महापुरुष बॅचलर नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाची आता चर्चा सुरू झाली आहे. त्यावरुन, त्यांची खिल्लीही उडवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं. तसेच, मारुतीराया त्यांची भेट घ्यायला येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसा निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी देव आणि महापुरुषांबद्दल विधान केलं. आपला कुठलाही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाहीत. संसार करुन सगळं करता येतं. सेवा देखील करता येते. जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याच रक्त हिरवं किंवा निळं आहे. परमेश्वराने कुठलाच भेद केला नाही. सगळ्यांना कॉमन करुन त्याने पाठवलं. सगळ्यांना दोन डोळे दोन कान आणि समान शरीर देवाने दिले आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावरुन, आव्हाड यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
'आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांत दादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या व सगळयांनी मारुतीकडे बघायला सुरुवात केली व मारुतीला चंद्रकांत दादांचं म्हणणं ऐकवलं. मारूतीने निर्णय घेतला आहे, कि लवकरच चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत कि नाहीत ह्यावर सविस्तर चर्चा करणार', असे आव्हाड यांनी म्हटले. तसेच, संसार करून पण सगळं करता येतं असं महापुरुष व देवांना उद्देशून चंद्रकांत दादांनी म्हटलं आहे. त्यावर आता रामदास स्वामी काय उत्तर देतात ह्यावर आता सगळ्यांच्या नजारा लागल्या आहेत, असा टोलाही आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांत दादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या व सगळयांनी मारुतीकडे बघायला सुरुवात केली व मारुतीला चंद्रकांत दादांचं म्हणणं ऐकवलं. मारूतीने निर्णय घेतला आहे, कि लवकरच चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत कि नाही ह्यावर सविस्तर चर्चा करणार.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 13, 2023
दरम्यान, आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टिकेला आता भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळेल, हे पाहावे लागेल.
हिंदू शब्दातच सर्वधर्मसमभाव - पाटील
स्वामी विवेकानंद यांनी अद्वेत विचार मांडला. जे स्वामीजींचा विचार आत्मसात करतात ते नक्की काहीतरी समाजासाठी करतात. हिंदु हा एक विचार आहे. हिंदु हा धर्म नाही. हिंदू राजा कधी कुणाच्या धर्मावर आक्रमण करत नाही. आपला सनातन धर्म ५ हजार वर्षांपूर्वीचा आहे. हिंदू या शब्दातच सर्व धर्म समभाव आहे. हिंदू विचारांमध्ये त्याचा आणि माझा एकच परमेश्वर आहे हा आपला हा विचार मांडला, असंही त्यांनी सांगितलं.