मुंबई - काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपात आला तर कुणाला आश्चर्य वाटायला नको, असं विधान भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावर काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांचे विधान हास्यास्पद आहे. पाटील हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत. ते असं विधान का करतात हे त्यांनाच माहित आहे अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर काँग्रेसचा कोण कार्याध्यक्ष भाजपात प्रवेश करेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. काही दिवसांपूर्वी विश्वजीत कदम भाजपात प्रवेश करतील अशी बातमी माध्यमांमध्ये आली होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे कदम यांचे नाव पुन्हा चर्चेत आले. त्यावर विश्वजीत कदम यांनी सांगितले की, मी माझी भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. लोकमतच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भाजपा प्रवेशाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ही चर्चा समोर आली. मात्र ती चर्चा निराधार होती, माझी भूमिका वारंवार स्पष्ट करण्याची गरज नाही. पतंगराव कदम यांनी 40 वर्ष काँग्रेसमध्ये काढली आहेत. मीदेखील काँग्रेससोबत एकनिष्ठ आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही असं विश्वजीत कदम यांनी सांगितले.
काँग्रेसचे एक प्रदेश कार्याध्यक्ष लवकरच भाजपमध्ये येतील, चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट
तसेच काँग्रेसने जी नवीन टीम केली आहे ती चांगल्या पद्धतीने काम करेल, विभागीय संतुलन राखण्यासाठी आणि ज्येष्ठ, तरुण यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न नवीन पदाधिकारी नियुक्तीत झाला आहे. काँग्रेसचा पाया पुन्हा मजबुत करण्यासाठी प्रयत्न करणार असून तळागाळातील कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम केलं जाईल असंही विश्वजीत कदम यांनी सांगितले.
दरम्यान पक्ष हितासाठी राहुल गांधी, सोनिया गांधी योग्य तो निर्णय घेतील. आम्ही आमची लढाई लढणार आहोत. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेला सामोरं जावू, महाराष्ट्रात पुन्हा आघाडी सरकार आणण्यासाठी प्रयत्न करु असा विश्वास काँग्रेस कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.