मुंबई-
भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ'वर भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा यांची जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे. सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. तर राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सोमवारी सकाळी सागर बंगल्यावर गुप्त भेट झाल्याचीही माहिती समोर आली आहे. याचा पुढचा अंक म्हणजे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. यावेळा बावनकुळेंनी राज ठाकरेंवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आणि त्यांना फायटर नेता अशी उपमा दिली.
"राज ठाकरे यांच्याशी माझे आधीपासूनच कौटुंबिक संबंध राहिलेले आहे. माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना ते आवर्जुन उपस्थित राहत आले आहेत. आजची भेट ही केवळ सदिच्छा भेट असून याला राजकीय रंग देण्याचं काहीच कारण नाही. राज ठाकरे हे एक फायटर नेते आहेत. ते आधीपासूनच हिंदुत्वाची भूमिका मांडत आले आहेत. हिंदुत्वाची भूमिका पुढे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी तेही एक आहेत", असं चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. त्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख यावेळी 'फायटर नेते' असा करत त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं.
युतीचा निर्णय केंद्र घेईलआगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेबाबत बोलताना बावनकुळे यांनी याबाबतचे सर्व निर्णय केंद्रीय पातळीवर घेतले जातील, असं स्पष्ट केलं. "भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह याबाबतचे निर्णय घेतील. मी पुन्हा एकदा सांगतो आजची भेट ही फक्त सदिच्छा भेट होती. हिंदुत्वाची भूमिका पुढे घेऊन जाणाऱ्या नेत्यांची भेट घेण्यावर कुणी हरकत घेण्याचं काहीच कारण नाही", असंही बावनकुळे म्हणाले.