“I.N.D.I.A.ची नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक, ही गरुड झेप नसून...”; भाजपचा जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 10:15 AM2023-08-31T10:15:06+5:302023-08-31T10:17:18+5:30

I.N.D.I.A. Vs NDA: परिवार बचाव अजेंडा घेऊन बैठका करा. क्विट इंडियाचा नारा देऊन जनता तुम्हाला कायमचे घरी बसवणार आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात आली.

chandrashekhar bawankule replied shiv sena thackeray group and india alliance over criticism on bjp | “I.N.D.I.A.ची नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक, ही गरुड झेप नसून...”; भाजपचा जोरदार पलटवार

“I.N.D.I.A.ची नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक, ही गरुड झेप नसून...”; भाजपचा जोरदार पलटवार

googlenewsNext

I.N.D.I.A. Vs NDA: भाजपविरोधात एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक दोन दिवस मुंबईत होत आहे. या बैठकीतून केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला जाईल. मागील दोन महिन्यांत पाटणा व बंगळुरूत बैठकांमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती असून मुंबईतील बैठकीत हा फॉर्म्युला कसा असेल, यावर चर्चा होऊन तो अंतिम होण्याची शक्यता आहे. या बैठकीवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने भाजप आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

देशात कायद्याचे राज्य नाही. मणिपूर, जम्मू–कश्मीर, महाराष्ट्रात लोकशाही नाही. न्यायालयास प्रतिष्ठा नाही व केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भयाचे साम्राज्य उभे केले गेले आहे. देशातील हे भयाचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची पाऊले मजबुतीने पडत आहेत. चीनपुढे गुडघे टेकणाऱ्या आजच्या भारतास विजयी करण्यासाठी ही ‘इंडिया’ची वज्रमूठ सज्ज आहे. भारत देश शक्तिमान व्हावा यासाठी ‘इंडिया’चा गरुड पक्षी झेपावला आहे, या शब्दांत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून टीका केली होती. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. 

I.N.D.I.A.ची नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक

मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला तुम्ही ‘गरूड झेप’ म्हणत आहात ती गरुड झेप नाही. पंतप्रधान मोदी यांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांचा टोळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली, कोरोना काळात कोट्यवधीची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. तुम्ही लालूप्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदीजींच्या ‘नरड्यावर बसण्याचं स्वप्न’ बघा. पण जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुम्ही पंतप्रधान मोदींना जेवढ्या शिव्या द्याल जनता पंतप्रधान मोदी यांच्यावर तेवढे जास्त प्रेम करेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. 

पंतप्रधान मोदींचा देश वाचविण्यासाठीचा अजेंडा

महात्मा गांधीजींनी ‘क्विट इंडिया‘चा नारा याच मुंबईतून दिला होता. त्यांच्या नाऱ्यामुळे इंग्रजांना देशातून जावे लागले. आता पुन्हा एकदा तोच ‘क्विट इंडिया‘चा नारा देऊन तुमच्या सारख्या भ्रष्ट प्रवृत्तींना जनता कायमचे घरी बसवणार आहे. पंतप्रधान मोदी यांचा तुमच्या(I.N.D.I.A.) विरोधातील संघर्ष हा स्वतःचे कुटुंब वाचवण्यासाठी नाही तर देश वाचविण्यासाठी आहे. तुम्ही तुमचा ‘परिवार बचाव’ अजेंडा घेऊन बैठका करा. कोट्यवधी देशवासीयांच्या स्वप्नपूर्तीचा अजेंडा घेऊन पंतप्रधान मोदी यांचे देशसेवेचे कार्य अखंड सुरू राहणार आहे, या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला. 


 

Web Title: chandrashekhar bawankule replied shiv sena thackeray group and india alliance over criticism on bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.