“मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजाचे आंदोलन ही उद्धव ठाकरेंच्या अधोगतीची सुरुवात”; भाजपाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 10:54 AM2024-08-11T10:54:49+5:302024-08-11T10:55:11+5:30
BJP Chandrashekhar Bawankule Replied Uddhav Thackeray: येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असा पलटवार करण्यात आला आहे.
BJP Chandrashekhar Bawankule Replied Uddhav Thackeray: वक्फ बोर्ड संशोधन बिलाच्या मुद्द्यावरून काही लोकांचा जमाव उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील 'मातोश्री' निवासस्थानासमोर आला व तेथे घोषणाबाजी करू लागला. त्यावेळी वांद्रे परिसरातील ठाकरे गटाचे कार्यकर्तेही तिथे जमा झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा मागविण्यात आला. या घोषणाबाजीवेळी उद्धव ठाकरे निवासस्थानीच होते. त्यानंतर ते ठाण्यातील सभेसाठी रवाना झाले.
ठाण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा महायुतीवर जोरदार प्रहार केला. यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. औरंगजेब फॅन क्लबचे म्होरके जनाब उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन राममुक्त भाजपा करायची बोंब ठोकली. पण हे तुम्हाला या जन्मात तरी शक्य होणार नाही. कारण तुम्ही मतांसाठी उबाठा गट हिरवा करून घेतला. छत्रपती शिवरायांचा वारसा सोडून तुम्ही औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहात, या शब्दांत बावनकुळे यांनी हल्लाबोल केला.
निवडणुकीत जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही
हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुमच्या सारख्या औरंगजेबी वृत्तीला कशी धूळ चारायची हे इथल्या मावळ्यांना ठाऊक आहे. आता तर शिवरायांची वाघनखंही महाराष्ट्रात आलीत, त्यामुळे याच वाघनखांच्या साक्षीने येणाऱ्या निवडणुकीत मतांच्या शस्त्राने जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
लांड्या, लबाड्या आणि धूळफेक करून तुम्ही जास्त दिवस लोकांना फसवू शकणार नाहीत. तुमच्या रॅलीतील हिरवे झेंडे जनता विसरली नाही. “लोकसभेला आम्ही तुमचे नऊ खासदार निवडून दिले मग वक्फ बोर्डाची बाजू का घेत नाही?”, असे म्हणत मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजाने आंदोलनही केले. भगवे सोडून हिरवे पांघरले की असेच होणार आहे. ही सुरुवात आहे तुमच्या अधोगतीची. वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना विसरलात, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.