...तर उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा; फडणवीसांवरील टीकेनं राजकारण तापलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 04:59 PM2023-04-04T16:59:11+5:302023-04-04T17:03:53+5:30
उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर आम्हीही ऐकणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांना बोलणार असाल तर आम्ही सोडणार नाही.
मुंबई-
उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर आम्हीही ऐकणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांना बोलणार असाल तर आम्ही सोडणार नाही. आज तुम्हाला शेवटची वॉर्निंग देत आहे. यापुढे फडणवीसांबाबत काही बोललात तर तुम्हाला घराबाहेरही पडू देणार नाही, असा थेट इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच फडणवीस यांचा उल्लेख लाचार गृहमंत्री असा केला. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
"उद्धव ठाकरे यांनी आज फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यानं मर्यादा ओलांडली आहे. पण अजूनही आम्ही त्यांना आज शेवटची संधी देत आहोत. यापुढे जर आमच्या नेत्यांबाबत अशी वक्तव्य करणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही. तुमचं घराबाहेर पडणं मुश्कील होईल. ज्या फडणवीसांना तुम्हाला भावासारखं प्रेम दिलं त्यांच्याबद्दल तुम्ही अशी विधानं कराल असं कधीच वाटलं नव्हतं", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
फडणवीसांच्या ताकदीची बरोबरी करू नका
"देवेंद्र फडणवीसांवर झालेले संस्कार आडवे येत आहेत. नाहीतर त्यांनीही उद्धव ठाकरेंना त्यांच्याच भाषेत उत्तर देता आलं असतं. उद्धव ठाकरे हे एक नंबरचे विश्वासघातकी आहेत. व्यक्तिगत टीका कधीच सहन करणार नाही. भाजपा राज्यातील नंबर एकचा पक्ष आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. जर अशीच टीका सुरू ठेवली तर आम्हालाही मातोश्री बाहेर जमावं लागेल. तुमचं घराबाहेर पडणं मुश्कील होईल. फडणवीसांबाबत विधान करताना सांभाळून बोला. त्यांच्या ताकदीशी बरोबरी तुम्ही कधीच करू शकणार नाही", असं बावनकुळे म्हणाले.