बीड - सत्ताधाऱ्यांकडून वारंवार राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न होत आहे. बीडच्या पालकमंत्री प्रचार सभेत खुलेआम घटना बदलण्याची भाषा करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली ही समतेची घटना बदलणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, एवढं ध्यानात ठेवा, असे म्हणत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना लक्ष्य केलं आहे.
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपली लढाई आहे. गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता देऊन यांनी काय केले? रेल्वेचे डबे बनवणारा कारखाना लातूरला गेला, रेल्वे आली नाही. ऊसतोड कामगारांना देशोधडीला लावलं, ऊसतोड महामंडळ बरखास्तीच्या प्रस्तावावर वारसदारांनी मुकाट सही केली. अहो, आमच्यासारख्या फाटक्या व्यक्तीने पण स्वाभिमान जपला असता, असे म्हणत राज्यघटना बदलण्याचं वक्तव्य केल्याचा संदर्भ देत, पंकजा मुंडेंवर निशाणा साधला.
पंकजा मुंडेंकडून निवडणूक प्रचारासाठी घेण्यात आलेल्या एका भाषणावेळी अनावधानाने राज्यघटना बदलू असा शब्द गेला होता. मात्र, लगेच आपली चूक सुधारत पंकजा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिली, संविधान दिले. त्यामुळेच, आपण इथपर्यंत पोहोचल्याचं म्हटले होते. तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजकार्याची महतीही पंकजांनी थोडक्यात सांगितली होती. दरम्यान, धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्या त्या विधानाचा धागा पकडत त्यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राज्यघटना बदलणे हे चिक्की खाण्याइतकं सोपं नसल्याचंही त्यांनी म्हटलं.