मुंबई - सध्या पावसाळा सुरू असल्याने मुंबईत खड्डे आणि पाणी पावलापावलावर दिसत आहे. त्यातच, नुकतेच लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यामुळे रस्त्यांवर गर्दी आणि वाहतुकीची वर्दळही वाढली आहे. गेल्या 3-4 दिवसांपूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सगळीकडे पाणीच-पाणी झाले होते. तर, लोकलसेवाही काही काळासाठी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईकरांचे पावसाच्या पाण्याने चांगलेच हाल होत आहेत.
मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका मुख्य रस्त्यावर मेनहोलचे झाकण खराब झाले आहे. त्यामुळे, मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना आणि पादचारी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खराब मेनहोलमुळे अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबई महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, अद्यापही या मेनहोलच्या कडेने दगड आणि पिशव्या ठेऊन येथून जाणाऱ्या वाहनांना इशारा देण्यात आला आहे. मात्र, महापालिकेनं तात्काळ हा मेनहोल बदलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सुरिंदर सिंग सुरी नावाच्या ट्विटर युजर्संने याबाबतचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. घाटकोपर-मानखुर्द रोडवरील जो वर्दळीचा मार्ग आहे, तेथील रस्त्यावर मेनहोलची ही दयनीय स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात महापालिकेत फोन केला, पण फोन उचलण्यात येत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसेच, लवकरात लवकर येथील मेनहोलचे झाकण रिप्लेस करावे, अशी मागणीही त्यांनी केलीय. सुरी यांचे ट्विट मुंबई ट्रॅफिक नावाच्या ट्विटर हँडलवरुनही रिट्विट करण्यात आलंय.