शिक्षण व्यवस्थेत बदल शक्य - मनीष सिसोदिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 04:56 PM2020-04-16T16:56:34+5:302020-04-16T16:57:19+5:30

महाराष्टातील शिक्षणाधिकारी, शिक्षक, अधिकाऱ्यांची चर्चासत्राला ऑनलाईन उपस्थिती; ऑनलाईन चर्चासत्रात दिल्लीच्या शिक्षणव्यवस्थेविषयी माहिती देताना व्यक्त केले मत

Change in education system possible - Manish Sisodia | शिक्षण व्यवस्थेत बदल शक्य - मनीष सिसोदिया

शिक्षण व्यवस्थेत बदल शक्य - मनीष सिसोदिया

googlenewsNext


मुंबई: जगभरात कोरोनाचे संकट थैमान घालत असताना महाराष्ट्र आणि दिल्ली शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयाला न डावलता त्यावर विचारमंथन करत आहे, ही गोष्ट निश्चितच देशाला भविष्यात पुढे नेणारी असल्याचे मत दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थी व पालकांना त्यांच्या शिक्षण विभागाकडून फोन आणि मेसेजेस करून मार्गदर्शन केले जात आहे. या काळात अभ्यास कसा करावा ? काय करावा ? कोणत्या अभ्यासावर पालकांनी भर द्यावा याची माहिती पालकांना दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या व्यावसायिक विकासासाठी ऑनलाईन व्यावसायिक विकास मंचाच्या ऑनलाईन चर्चासत्रात ते बोलत होते.

व्यावसायिक विकास मंचाच्या सहाव्या ऑनलाईन चर्चासत्रात दिल्लीतील शैक्षणिक प्रयोग' या विषयावर शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी तेथील शिक्षणाच्या मॉडेलची माहिती दिली आणि आपली मते व्यक्त केली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार देणे, १०० टक्के निकाल लावणे , आयआयटी , आयआयएम सारख्या संस्थेमध्ये प्रवेश मिळवून देणे या ऐवजी विद्यार्थी नापास झाला तरी विकसित कसा होईल, त्याला कौशल्यपूर्ण कसे बनविता येईल? दहा वेळा चुकला तरी त्याने अकराव्या वेळी पुन्हा प्रयत्न करायला हवा असा दृष्टीकोन त्यांच्यामध्ये कसा निर्माण करता येईल हा प्रयत्न शाळांचा , शिक्षकांचा हवा. आज देशातील जितक्या शैक्षणिक संस्था आहेत, तेथील शिक्षक , विद्यार्थी,पालक यांच्या माईंडसेट म्हणजे द्र्दृष्टीकोनात बदल होणे आवश्यक आहे तरच देशाचे भविष्य काहीतरी वेगळे असू शकेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील शिक्षणाच्या मॉडेलची माहिती देताना तेथील एकूण बजेटचा २५ टक्के भाग शिक्षणासाठी देण्यात आला असून इन्फ्रास्ट्रक्चर, टीचर्स ट्रेनिंग, पॅरेंटल एंगेजमेंट व करिक्युलम रिफॉर्म या ४ ,महत्त्वाच्या घटकांवर काम केल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील अनेक शिक्षणाधिकारी,शिक्षक , शिक्षण विभागातील अधिकारी यांनी झूम एप्लिकेशनद्वारे या चर्चेत आपला सहभाग दर्शविला आणि प्रश्न विचारले. आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये रिसर्च अप्रोच कमी असून तो वाढविण्यासाठी काय केले जाणे अपेक्षित आहे असा प्रश्न विचारल्यानंतर मुळातच आपल्या देशात विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून भीतीची भावना कायम राखली जाते. त्यामुळे संशोधन वृत्तीला चालना मिळत नाही. न घाबरता प्रयत्न करणारा विद्यार्थीच संशोधनांकडे वळू शकतो, नवीन रिसर्च करू शकतो तेव्हा मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे मत सिसोदिया यांनी मांडले. शाळांतील कमी पटसंख्येबद्दल बोलत असताना सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर आणि शाळांच्या दर्जावर काम करायला हवे, मग पटसंख्या आपोआप वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी त्यांना त्यांच्या नवीन करिक्युलम रिफॉर्म संदर्भातील माहिती विचारली असता दिल्लीचे स्वतःचे शैक्षणिक मंडळ स्थापण्याचा विचार असून स्कुल ऑफ स्पेसिफिक एक्सिलन्स नावाचे करिक्युलम अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा विचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. 

Web Title: Change in education system possible - Manish Sisodia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.