Join us

रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी जीआरमध्ये बदल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्या मुंबईसह राज्यात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांना रेमडेसिविर,ऑक्सिजन आणि बेड मिळत नाही अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या मुंबईसह राज्यात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांना रेमडेसिविर,ऑक्सिजन आणि बेड मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यातच सरकारने रेमडेसिविरचा काळाबाजार थांबविण्यासाठी रुग्णाला जिल्हा प्रांत अधिकाऱ्यांकडून रेमडेसिविर रुग्णालयात मिळेल, असा नवीन जीआर काढला आहे. मात्र यामध्ये काळाबाजार होत असून प्रांत अधिकाऱ्यांकडून रुग्णाच्या नावाने रुग्णालयामध्ये पाठविलेले रेमडेसिविर रुग्णापर्यंत पोहोचतच नाही, ही वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी जीआरमध्ये बदल करा, अशी मागणी राज्यातील आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या अंधेरी येथील अभिषेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुनीता नागरे यांनी माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली आहे.

रुग्णालयामध्ये विचारणा केल्यावर तुमच्या नावावर सरकारकडून रेमडेसिविर आले नसल्याने आम्ही रुग्णाला ते देऊ शकत नाही, असे उत्तर रुग्णांच्या नातेवाइकांना दिले जाते. त्यामुळे रुग्णाच्या नावावर सरकारकडून आलेले रेमडेसिविर पेशंटला न मिळणे ही खूप मोठी खंत आहे.

सरकारने जीआरमध्ये नवीन बदल करून इंजेक्शन मिळाल्यानंतर रुग्ण किंवा त्याच्या नातेवाइकालासुद्धा रेमडेसिविर दिले याची पोच देणारा एक मेसेज पाठवून त्यांच्या नातेवाइकांसमोर इंजेक्शन देणे सक्तीचे करावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.

प्रशासनाकडून मिळालेले इंजेक्शन त्या रुग्णांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यातच सर्वसामान्य लोकांचा जीव जातो. हे कुठेतरी थांबले पाहिजे, अशी विनंती नागरे यांनी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली.

---------------------------