Join us

पक्ष्यांच्या अधिवासातील बदलाचा होणार अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:53 AM

बीएनएचएस : १४ एप्रिलपासून पक्षी गणनेला सुरूवात; उन्हाळ्याचा परिणामांची माहिती घेणार

मुंबई : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री आॅफ सोसायटी (बीएनएचएस)च्यावतीने ‘कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम’ (सीबीएमपी) ही पक्षी गणना आयोजित करण्यात आली आहे. ही पक्षी गणना १४ ते २१ एप्रिल यादरम्यानच्या काळामध्ये पार पडणार आहे. वर्षभरामध्ये तीनवेळा पक्ष्यांची गणना केली जाते. उन्हाळ््यामध्ये पक्ष्यांच्या अधिवासामध्ये कोणता बदल झाला आहे का? याचा अभ्यास करण्यासाठी खास करून ही पक्षी गणना केली जाते.

सीबीएमपीमध्ये पक्षी निरीक्षक, प्राणीमित्र संस्था, पक्षी अभ्यासक आणि निसर्ग प्रेमी इत्यादी पक्षी गणनेत सहभागी होऊ शकतात. तसेच ही गणना राष्ट्रीय स्तरावर करण्यात येणार आहे. वैज्ञानिक पद्धतीनुसार गणना करण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी नोंद केली जाणार आहे.मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ज्याठिकाणी पक्ष्यांचा अधिवास आहे. तिथे जाऊन नजरेस पडलेल्या पक्ष्यांची नोंद करणे. अधिकाधिक नागरिक पक्षी गणनेत सहभागी झाल्यास पक्ष्यांबद्दलची माहिती जास्त मिळू शकेल, असे आवाहन बीएनएचएसद्वारे करण्यात आलेआहे.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री आॅफ सोसायटीचे संचालक दीपक आपटे यासंदर्भात म्हणाले की, सामान्य पक्ष्यांच्या अधिवासावर कोणता परिणाम होतोय, हे या गणनेतून समजते.तसेच वाढते शहरीकरण, प्रदुषण आणि वृक्षतोड यांचा पक्ष्यांच्या अधिवासावर कोणता परिणाम होताय, याचा अंदाज असा काढता येत नाही. त्यासाठी वेळोवेळी पक्ष्यांची गणना क रणे आवश्यक असते. त्यामुळे बीएनएचएसने ही मोहिम सुरू केली आहे. 

चिमणी, कावळा, पोपट, कबूतर आणि कोकीळा इत्यादी सामान्य पक्ष्यांची गणना केली जाते. पक्ष्यांची गणना हिवाळ््यामध्ये जानेवारी महिन्यात, उन्हाळ््यामध्ये एप्रिल महिन्यात आणि पावसाळ््यामध्ये सप्टेंबर महिन्यात केली जाते. शहरीकरणामुळे चिमणी, हळद्या, दयाल या पक्ष्यांचा अधिवास कमी होत चालला आहे. हे पक्षी क्वचितच दिसून येतात. गणना एकाच ठिकाणी तीनवेळा करणे आवश्यक असून त्यातून बदलत्या ऋतुप्रमाणे पक्ष्यांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणे सोपे जाते.- कुणाल मुनसिफ, पक्षी निरीक्षक