श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या कार्यकारिणीमध्ये भर गणेशोत्सवात काही बदल करण्यात आले आहेत. मनसेकडून गैरव्यवहाराचे आरोप झालेल्या नंदा राऊत यांच्या जागी कार्यकारी अधिकारी पदी म्हणून वीणा मोरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंदिर कार्यकारिणीच्या कारभाराची जोरदार चर्चा सुरू आहे.
प्रभादेवी श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरात प्रत्येक मंगळवारी, संकष्ट चतुर्थीला आणि सुट्टीच्या दिवशी लाखो भाविकांची प्रचंड गर्दी असते. भाविकांना बाप्पाचे दर्शन सुरक्षित आणि सुलभ व्हावे म्हणून कार्यकारी अधिकारी यांची मोठी जबाबदारी असते. शिवाय विविध समाजोपयोगीउपक्रम मंदिराकडून सुरु असतात. त्यामुळे भाविकांची श्रद्धा आणि समाजकार्य यांची योग्य प्रकारे सांगड घालत काम करणे मंदिर कार्यकारिणीसाठी मोठे आव्हान असते.
सध्याच्या कार्यकारी अधिकारी पदी नंदा राऊत होत्या. राऊत यांच्यावर मनसे कडून गैरव्यवहाराचे आरोप झाले होते आणि त्यांच्या चौकशीची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर मंदिर कार्यकारिणीची सर्वत्र जोरदार चर्चा होती. आता त्यात बदल करण्यात आले असून वीणा मोरे पाटील यांची प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. नव्या मोरे पाटील शालेय शिक्षण विभागात अपर सचिव पदावर कार्यरत आहेत. दरम्यान, नंदा राऊत यांना संपर्क साधला असता त्याच्याकडून प्रतिक्रिया मिळाली नाही.