लोकसभा निवडणुकीपूर्वी नामकरण; अहमदनगरचे केले अहिल्यानगर, मंत्रिमंडळाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 06:05 AM2024-03-14T06:05:08+5:302024-03-14T06:06:36+5:30
मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावेही बदलणार, पुण्यातील वेल्हे होणार राजगड
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळ बैठकांचा सपाटा सुरू असून बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीत तब्बल २६ निर्णय घेण्यात आले. निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा, तालुका आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा यात समावेश आहे. अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्यावर शिक्कामोर्तब झाले. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर नामांतरण करण्यात येईल. दरम्यान, मराठी भाषा धोरणासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
मानसेवी अध्यापकांना दिलासा
राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयामधील मानसेवा अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्राध्यापकांना आता ३० हजार रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना २५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्यांच्या मानधनात २६ वर्षांपासून कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.
आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ५ हजारांची वाढ
आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ५ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. त्यांना सध्या राज्य शासनाकडून ५ हजार व केंद्र सरकारकडून ३ हजार रुपये मानधन मिळते.
पोलिस पाटलांना मानधन वाढ
पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. आता पोलिस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मिळतील. सध्या त्यांना ६५०० रुपये मिळतात. राज्यात पोलिस पाटलांची ३८ हजार ७२५ पदे आहेत.
८ स्थानकांची नावे बदलली
मुंबईतील करी रोड रेल्वे स्थानकाचे लालबाग, मरीन लाईन्सचे मुंबादेवी, चर्नी रोडचे गिरगाव, कॉटन ग्रीनचे काळाचौकी, सॅन्डहर्स्टचे डोंगरी, डॉकयार्डचे माझगाव तसेच किंग्ज सर्कलचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ करण्याचा निर्णय घेतला. पुढील अधिवेशनात मान्यता घेऊन प्रस्ताव केंद्रीय गृह व रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला जाईल.
वेल्हे तालुक्याचे नाव राजगड : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता देण्यात आली. याच तालुक्यात किल्ले राजगड असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.