लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मढमधील बेकायदा फिल्म स्टुडिओंमुळे पालिका प्रशासनावर झालेल्या टीकेचा धसका घेत मुंबई महापालिकेने स्टुडिओ उभारण्याच्या नियमावलीत बदल केला आहे. स्टुडिओ उभारताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची पालिका खबरदारी घेणार असून, प्रॉडक्शन हाउसनाही अडचणी येणार नाहीत याचीही काळजी घेणार आहे.
मालाडच्या मढ, मार्वे, एरंगळ आणि भाटी या समुद्रकिनाऱ्यावर बेकायदा फिल्म स्टुडिओ व बंगले बांधण्यात आले आहेत. हे बंगले व स्टुडिओ चित्रपटांसह अन्य कार्यक्रमांचे चित्रीकरण करण्यासाठी भाड्याने दिले जातात. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करत २०२१ आणि २०२२ या कालावधीत मढ, मार्वेमध्ये अनधिकृत स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे माजी मंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने स्टुडिओ उभारल्याचा आरोप माजी खा. किरीट सोमय्या यांनी केला होता. राष्ट्रीय हरित लवादाने अखेर ही बांधकामे अनधिकृत ठरवत काढून टाकण्याचे आदेश दिलेत.
इतर स्टुडिओंवरसुद्धा कारवाई करण्यात आली. मुंबईत बेकायदा स्टुडिओ उभे राहणार नाही यासाठी पालिका आता खबरदारी घेत आहे. प्रशासनाने स्टुडिओ उभारण्याच्या नियमावलीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय हे स्टुडिओ पर्यावरणपूरक कसे असतील याच्यावरही लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
११ स्टुडिओ आणि २२ बंगल्यांविरोधात तक्रार करण्यात आली. ११ पैकी ४ स्टुडिओ आधीच पाडून टाकण्यात आले होते.