वर्सोवा-विरार सागरी सेतूच्या आराखड्यात बदल, आता उत्तन ते विरार असा मार्ग उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:26 AM2024-03-14T10:26:09+5:302024-03-14T10:26:39+5:30
विरार ते पालघर सेतूही प्रस्तावित.
मुंबई : दक्षिण मुंबईची थेट विरारला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या आराखड्यात बदल करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. वर्सोवा ते विरार सागरी सेतूऐवजी भाईंदर येथील उत्तन ते विरार, असा जोडरस्त्यासह सागरी सेतू एमएमआरडीएकडून उभारणार आहे.
पालिकेकडून वर्सोवा ते भाईंदरदरम्यान उभारण्यात येत असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पामुळे वर्सोवा ते भाईंदरदरम्यान सागरी सेतूची गरज उरली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. वर्सोवा ते विरारदरम्यान समुद्रातून ४२ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू उभारण्यात येणार होता. मात्र, पालिकेनेही वर्सोवा ते भाईंदरदरम्यान कोस्टल रोड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. त्यामुळे लवकरच या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. निधी उभारण्याचाही मार्ग मोकळा कर्ज जायकाकडून घेतले जाणार आहे.
एमएमआरडीएकडून उभारल्या जाणाऱ्या वर्सोवा ते विरार सागरी सेतूचा वर्सोवा ते भाईंदर हा मार्ग पालिकेच्या कोस्टल रोडला समांतर जात होता. एकाचवेळी दोन्ही रस्त्यांची गरज उरली नसल्याने या प्रकल्पाचा सुधारित आराखडा सादर करण्यास राज्य सरकारने सांगितले. एमएमआरडीएने केवळ उत्तन ते विरार, असा सागरी मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे एमएमआरडीएकडून आता भाईंदर ते विरार, असा सुमारे २४ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू उभारला जाणार आहे. त्यासाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्चाच्या सुमारे ७० टक्के कर्ज जायकाकडून घेतले जाणार आहे. त्यातून प्रकल्पासाठी निधी उभारण्याचाही मार्ग मोकळा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता -
मुंबई उपनगरातील वाहतुकीला गती देण्यासाठी उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. एमएमआरडीएने सादर केलेल्या पहिल्या टप्प्यात उत्तन ते विरार या जोड रस्त्यासह सागरी सेतू व दुसऱ्या टप्प्यात विरार ते पालघर सागरी सेतू मार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी घ्यावयाचे कर्ज हे वित्त मंत्रालयाच्या अटी व शर्तींच्या अधिन राहून घेण्यात येईल.
शिवाय एमएमआरडीएकडून उभारण्यात येणाऱ्या भाईंदर ते विरार सागरी मार्गामुळे दक्षिण मुंबईतून थेट विरारपर्यंत विनाअडथळा पोहचणे शक्य होणार आहे. नरिमन पॉइंट येथून विरार येथे पोहण्यासाठी केवळ एक तासाचा वेळ लागेल.