जीवनशैली बदला, वंध्यत्व टाळा ! वेळोवेळी रक्ततपासणी, सोनोग्राफी करण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 07:13 AM2024-12-01T07:13:15+5:302024-12-01T07:14:07+5:30
शरीरातील अंतर्गत बिघाडामुळे वंध्यत्व येऊ शकते. साधारण १० वी, १२ वीपर्यंत मुली-मुलांच्या पोषण आहारावर पालकांचे लक्ष असते.
मुंबई : मुलींमध्ये वंध्यत्वाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. याला फक्त महिलाच कारणीभूत नसतात, तर पुरुषांमध्येही कमतरता असू शकते. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, पोषण आहाराची कमतरता, जागरण, हार्मोन्समधील बिघडलेले संतुलन अशी अनेक करणे वंध्यत्वास कारणीभूत ठरतात. शरीरात घडणारे बदल हा मुख्य घटक आहेच, पण जीवनशैलीतही बदल करण्याची गरज आहे. वंध्यत्वाचे वाढते प्रमाण, त्यामागील कारणे यावर डॉ. स्वाती डबरासे यांनी प्रकाशझोत टाकला.
काय काळजी घ्यावी?
शरीरातील अंतर्गत बिघाडामुळे वंध्यत्व येऊ शकते. साधारण १० वी, १२ वीपर्यंत मुली-मुलांच्या पोषण आहारावर पालकांचे लक्ष असते. मात्र मुले-मुली महाविद्यालयात जाऊ लागतात, तेव्हा त्यांची जीवनशैली बदलते. सकाळचे महाविद्यालय असेल तर घाईघाईत नाष्टा होत नाही. नंतर भूक लागल्यावर रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाल्ले जातात. महाविद्यालय शिक्षण तसेच नोकरी करताना एक ताण असतो.
त्याचाही परिणाम शरीरावर होतो. पुरेसा व्यायाम होत नाही. किमान दोन तास तरी शारीरिक कसरती केल्या पाहिजेत. रात्री उशिरा मोबाइलमध्ये रमणे टाळले पाहिजे. मैदा, गोड पदार्थ, चिप्स, तळलेले पदार्थ खाण्याचे टाळावे. पाळी नियमित होत नसल्यास रक्त तपासणी आणि सोनोग्राफी करून घ्यावी.
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे काय ?
मेंदूपासून अंडकोशापर्यंत एक सिस्टीम कार्यरत असते. हे चक्र बिघडले की अंडकोशावर सूज येते त्यामुळे पाळी नियमित होत नाही. शरीरावर परिणाम दिसू लागतात. वजन वाढते. काही महिलांचे केस गळतात, चेहऱ्यावरील केस वाढतात, मुरुमे येतात, चेहऱ्यावर काळपटपणा येतो. ही लक्षणे दिसतात त्यास पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असे म्हणतात.
पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसिज म्हणजे काय ?
अंडकोशात बुडबडे तयार होतात. अंडकोशाचा आकार वाढतो, पाळी नियमित येत नाही. त्यातून मग अनेक समस्या निर्माण होतात. त्यास पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसिज असे म्हणतात.
काय असू शकतात वंध्यत्वाची कारणे?
लग्नानंतर स्त्री आणि पुरुषात शारीरिक संबंध होऊन वर्षभरात बीजधारणा होत नसेल तर काहीतरी समस्या असते. फक्त महिलांमध्ये समस्या असू शकते असे नाही, तर पुरुषांमध्येही असू शकते. कधी कधी टबमध्ये ब्लॉक असतो. हार्मोन्समधील संतुलन बिघडते, त्यामुळे बीजनिर्मिती होत नाही.