मोर्चाचे सुरुवातीचे तसेच शेवटचे ठिकाण बदला; महाविआच्या नेत्यांना पोलिसांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 08:16 AM2022-12-13T08:16:19+5:302022-12-13T08:16:59+5:30
महाविकास आघाडी नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी मोर्चासंदर्भात मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापुरुषांचा होणारा अपमान, सीमाप्रश्न, तसेच शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या १७ डिसेंबरच्या मोर्चाचे सुरुवातीचे आणि शेवटचे ठिकाण बदलण्याची सूचना पोलिसांनीमहाविकास आघाडीच्या नेत्यांना केली आहे.
या मोर्चाची सुरुवात जिजामाता उद्यानापासून होऊन तो आझाद मैदानापर्यंत जाणार आहे. मात्र, याऐवजी हा मोर्चा भायखळा येथील रिजर्डसन क्रूडास कंपनीपासून सुरू करून तो टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंतच काढावा अशी सूचना पोलिसांनी केली आहे.
महाविकास आघाडी नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी मोर्चासंदर्भात मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मोर्चाच्या नियोजनाबाबत माहिती दिल्यानंतर मुंबईच्या वाहतुकीवर येणारा ताण लक्षात घेता पोलिस आयुक्तांनी मोर्चाचे सुरुवातीचे आणि शेवटचे ठिकाण बदलण्याची सूचना केली. पोलिसांच्या या सूचनेनुसार महाविकास आघाडी मोर्चात काही बदल करणार का याचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.