पूर्ण मॅरेथॉनच्या वेळेमध्ये बदल करावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:57 AM2018-01-22T02:57:32+5:302018-01-22T02:57:48+5:30

मॅरेथॉनदरम्यान वाढलेल्या उष्णतेमुळे कामगिरी उंचावण्यात आलेले अपयश व झालेली दमछाक यामुळे पूर्ण मॅरेथॉनला एक तास आधी सुरुवात करण्याची इच्छा धावपटूंनी व्यक्त केली.

 Change the timing of the full marathon ... | पूर्ण मॅरेथॉनच्या वेळेमध्ये बदल करावा...

पूर्ण मॅरेथॉनच्या वेळेमध्ये बदल करावा...

Next

मुंबई : मॅरेथॉनदरम्यान वाढलेल्या उष्णतेमुळे कामगिरी उंचावण्यात आलेले अपयश व झालेली दमछाक यामुळे पूर्ण मॅरेथॉनला एक तास आधी सुरुवात करण्याची इच्छा धावपटूंनी व्यक्त केली.
अर्ध मॅरेथॉन व हौशी पूर्ण मॅरेथॉन पहाटे ५.४० वाजता सुरू झाली. ऊन पडण्याआधीच अर्ध मॅरेथॉन समाप्त झाल्याने या धावपटूंना उष्ण वातावरणाचा सामना करावा लागला नाही. परंतु, एलिट पूर्ण मॅरेथॉन ७.१० वाजता सुरू झाल्याने काही किमी अंतर पार केल्यानंतरच धावपटूंना उष्णतेचा सामना करावा लागला. वातावरणात गारवा पसरला होता, तरी शर्यतीदरम्यान आवश्यक असलेले थंड वातावरण न मिळाल्याने विदेशी धावपटूंचा हिरमोड झाला. यंदा चार प्रमुख आफ्रिकन धावपटूंकडून स्पर्धा विक्रम मोडण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यांना आपल्या सर्वोत्तम कामगिरीचीही बरोबरी करण्यात यश आले नाही.
भारतीय धावपटूंनाही उष्णतेच्या अडचणींचा सामना करावा लागला. रौप्य विजेता नितेंदर सिंग याने पूर्ण मॅरेथॉनच्या वेळेत बदल करून घेण्याची इच्छा व्यक्त केली. पूर्ण मॅरेथॉनसाठी सकाळी ६ ची वेळ योग्य असून या वेळेत शर्यत सुरू झाल्यास आम्हाला कामगिरी उंचावता येईल. असे झाल्यास या स्पर्धेत नक्कीच विश्वविक्रमाचीही नोंद होईल. परंतु, हे सर्व स्पर्धा आयोजकांनी मनावर घेतले पाहिजे, असे नितेंदरने म्हटले.
भारतीय महिला गटाची विजेती आॅलिम्पियन सुधा सिंगनेही उष्ण वातावरणाचा प्रश्न निर्माण केला. तिने म्हटले की, ‘शर्यत ७ वाजता सुरू झाली आणि तेव्हापासूनच ऊन पडले होते. त्यामुळे कामगिरीवर मोठा परिणाम झाला. शर्यत लवकर सुरू झाल्यास नक्कीच त्याचा आम्हाला फायदा होईल. धावताना खूप दमछाक झाली. कांस्य पदक विजेती पारुल चौधरीनेही उष्णेमुळे वेगात सातत्य राखण्यात अपयश आल्याचे म्हटले.
एलिट धावपटू उष्ण वातावरणाशी झुंजत असताना दुसरीकडे हौशी मुंबईकर धावपटूंचा मोठाच कस लागला. अनेकांना उष्णतेचा त्रास झाल्याने मॅरेथॉन मार्गावर उपचार करावे लागले. मात्र, तरीही त्यांनी मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करण्याची कामगिरी केली. संपूर्ण मॅरेथॉनमध्ये सज्ज असलेल्या ५०० डॉक्टर्सनी दमछाक झालेल्या धावपटूंवर उपचार केले. त्याच वेळी ११ रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या होत्या आणि प्रकृती खालावलेल्या धावपटूंना लगेच बेस कॅम्प व रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title:  Change the timing of the full marathon ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.