Join us  

महिला डब्यातील सुरक्षा वेळेत होणार बदल

By admin | Published: July 08, 2016 1:40 AM

महिला प्रवाशांचा विनयभंग, छेडछाड आणि त्यांच्यावर होणारे हल्ले पाहता लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्याचा आढावा रेल्वे पोलिसांकडून

मुंबई : महिला प्रवाशांचा विनयभंग, छेडछाड आणि त्यांच्यावर होणारे हल्ले पाहता लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्याचा आढावा रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी)घेतला जात असून, सुरक्षा वेळेत बदल करण्यावर गांभीर्याने विचार केला जात आहे. यासंदर्भात महिला प्रवाशांशीदेखील चर्चा येत्या दोन आठवड्यांत केली जाणार आहे. यात खासकरून रात्रीच्या सुरक्षा वेळेत बदल करण्यावर अधिक भर देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय (लोहमार्ग) यांनी दिली. लोकलमधून प्रवास करताना पहाटेच्या किंवा रात्रीच्या प्रवासात महिला प्रवाशांना छेडछाड, विनयभंग, अश्लील हावभाव तसेच चोरीच्या उद्देशाने मारहाणीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. काही महिन्यांपूर्वी चर्चगेट लोकलमधून प्रवास करणाऱ्या युवतीचा रात्री सव्वा अकराच्या सुमारास एका तरुणाने विनयभंग केला. यात युवतीला मारहाणही करण्यात आली. मात्र आरडाओरडा करताच आरोपीने पळ काढला. या घटनेनंतर रात्रीचा प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. अशा अनेक घटनांनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेत एक पोलीस उपायुक्त आणि एक सहायक पोलीस आयुक्त यांची समिती नुकतीच नेमली. त्यांच्याकडून पोलीस आयुक्तांना अहवालही सादर करण्यात आला. या अहवालानुसार महिलांच्या सुरक्षेसाठी उपाय सुचवण्यात आले. मात्र हा अहवाल सादर झाल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून सुरक्षेसाठी त्वरित कोणतेही पाऊल उचलण्यात आले नव्हते. सध्या सरसकट रात्री साडेआठ ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत रेल्वे पोलीस महिला डब्यात तैनात केले जातात. मात्र महिला प्रवाशांबाबतीत होणाऱ्या घटना या रात्रीच्या सुमारासच घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रात्री ९ वाजल्यापासून सीएसटी किंवा चर्चगेटला येणाऱ्या लोकलमधील महिला डब्यात तर रात्री १० वाजल्यापासून सीएसटी आणि चर्चगेटहून सुटणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात रेल्वे पोलीस नेमता येतील का, याची पडताळणी केली जात आहे. (प्रतिनिधी)आणखी चांगली सुरक्षा पुरवूपोलीस आयुक्त (लोहमार्ग) मधुकर पाण्डेय यांनी सांगितले की, महिला प्रवाशांना सुरक्षा आणखी चांगल्या रीतीने कशी करता येईल याचा विचार केला जात आहे. त्यासाठी महिला डब्यातील सुरक्षा वेळेत बदल करण्यासाठी आम्ही महिला प्रवासी संघटनांशी चर्चा करणार आहोत.