यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गेली काही वर्षे युती, आघाडीतील पक्ष बदलले, सत्तांतरे झाली, मोठ्या प्रत्येक पक्षाला सत्तेत जाण्याची संधी मिळाली. आता लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. केवळ भाजपमध्येच नेते गेले असे नाही, त्या-त्या मतदारसंघातील नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार नवे पक्ष निवडले. झट पक्षांतर आणि पट तिकीट असेही काही जणांबाबत घडले.
- आ. नीलेश लंके : पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार. अजित पवार गटात गेले. आमदारकीचा राजीनामा दिला, शरद पवार गटात गेले आणि अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली.
- आ. राजू पारवे : काँग्रेसचे उमरेडचे (जि. नागपूर) आमदार. रामटेक लोकसभेची जागा महायुतीत शिंदेसेनेकडे गेली आणि लगोलग या पक्षात गेले व उमेदवारी मिळाली.
- शिवाजीराव आढळराव पाटील : बंडाच्या वेळी उद्धवसेना सोडून शिंदेसेनेत गेले. शिरूरची जागा अजित पवार गटाकडे जाताच त्या गटात प्रवेश आणि उमेदवारी मिळाली.
- धैर्यशील मोहिते पाटील : अकलूजच्या (जि. सोलापूर) मोहिते घराण्यातील नेतृत्व. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा, आता शरद पवार गटाकडून माढातून उमेदवारी.
- अर्चना पाटील : तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी. महायुतीत ही जागा अजित पवार गटाकडे गेली, लगेच या गटात प्रवेश व उमेदवारी.
- करण पवार : पारोळ्याचे नगराध्यक्ष (भाजप) होते. अलीकडेच उद्धवसेनेत प्रवेश आणि जळगावची उमेदवारी मिळाली.
- बजरंग सोनवणे : अजित पवार गटात होते, शरद पवार गटात गेले आणि बीडची उमेदवारी.
अन्य महत्त्वाची पक्षांतरे अशी...
- अशोक चव्हाण : ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री. फेब्रुवारीत भाजपमध्ये प्रवेश, राज्यसभेची संधी.
- डॉ. उल्हास पाटील : काँग्रेस ते भाजप. जळगावचे माजी खासदार. कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासमवेत भाजपमध्ये गेले.
- उन्मेष पाटील : जळगावचे विद्यमान भाजप खासदार. पक्षाने उमेदवारी नाकारली. उद्धवसेनेत प्रवेश पण उमेदवारी नाही.
- बबनराव घोलप : उद्धवसेना ते शिंदेसेना. माजी मंत्री, अनेक वर्षे नाशिक रोडचे आमदार. शिर्डीतून उमेदवारी न मिळाल्याने नाराज होते.
- गोविंदा : एकेकाळी काँग्रेसचे खासदार. गेली काही वर्षे राजकीय विजनवासात. शिंदेसेनेत प्रवेश.
- अमर काळे : आर्वीचे माजी काँग्रेस आमदार. वर्धेची जागा मविआमध्ये शरद पवार गटाकडे गेली, या गटाकडून उमेदवारी. माजी मंत्री अनिल देशमुख यांचे सख्खे भाचे.
- मिलिंद देवरा : काँग्रेस ते शिंदेसेना. माजी केंद्रीय राज्यमंत्री. काँग्रेस सोडून शिंदेसेनेत जाताच राज्यसभेची संधी मिळाली.
- डॉ. अर्चना पाटील चाकूरकर : भाजपमध्ये प्रवेश. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवाजीराव पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा.
- बसवराज पाटील : माजी मंत्री, भाजपमध्ये गेले पण लोकसभा मिळाली नाही, विधानसभेवर नजर.
- डॉ. नामदेव उसेंडी : गडचिरोलीची उमेदवारी काँग्रेसने नाकारली, भाजपमध्ये प्रवेश.
- अनुराधा पौडवाल : ज्येष्ठ गायिका, पहिल्यांदाच राजकारणात. दिल्लीत भाजप प्रवेश.
- एकनाथ खडसे : अनेक वर्षे भाजपमध्ये गेली. त्यानंतर भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश. आता भाजपच्या मार्गावर.
- प्रकाश देवतळे : चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष होते. अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश.
- पद्माकर वळवी : आघाडी सरकारच्या काळात क्रीडा मंत्री. काँग्रेस सोडून अलीकडेच भाजपमध्ये.
- आ. रवींद्र वायकर : उद्धवसेनेचे जोगेश्वरी पूर्वचे आमदार. ईडी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. अलीकडेच शिंदेसेनेत प्रवेश.
- रश्मी बागल : करमाळा (जि. सोलापूर) मतदारसंघातून २०१९ मध्ये शिवसेनेकडून विधानसभा लढविली. भाजपमध्ये प्रवेश.
- अमर राजूरकर : माजी विधान परिषद सदस्य. अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक, काँग्रेसमधून भाजपमध्ये.