सीईटी परीक्षांच्या तारखांत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:07 AM2021-09-21T04:07:59+5:302021-09-21T04:07:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई सध्या राज्यात १५ सप्टेंबरपासून सीईटी परीक्षांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, पुढील महिन्यातील विधी, हॉटेल मॅनेजमेंट, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
सध्या राज्यात १५ सप्टेंबरपासून सीईटी परीक्षांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, पुढील महिन्यातील विधी, हॉटेल मॅनेजमेंट, एमपीएड आणि शारीरिक चाचण्यांच्या परीक्षा तारखांमध्ये सीईटी सेलकडून बदल करण्यात आले आहेत. या परीक्षांच्या प्रस्तावित तारखा आणि जेईई ॲडव्हान्स परीक्षेच्या तारखा एकाच दिवशी येत असल्याने परीक्षा केंद्रांचा अभाव येत होता. त्यामुळे या तारखांत बदल करण्यात आपले असून सुधारित तारखा सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे.
राज्यातील यंदाच्या व्यावसायिक सीईटी परीक्षांसाठी ७ सप्टेंबर रोजी वेळापत्रक जाहीर केले होते. १५ सप्टेंबरपासून या परीक्षांना सुरळीतपणे सुरुवात झाली असून सद्यस्थितीत एमएचटी सीईटीच्या परीक्षा सुरु आहेत. दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी जेईई ॲडव्हान्सची परीक्षा नियोजित असल्याने आयआयटी मुंबईकडून केंद्राच्या अभावी सीईटीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सीसीईटी सेलकडे केली होती. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून ३ ऑक्टोबर रोजीच्या परीक्षांचे आयोजन ८ ऑक्टोबर रोजी केले असून त्याचा तपशील संकेतस्थळावर जाहीर केला आहे.
सुधारित वेळापत्रक
परीक्षा - सुधारित तारीख
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी / बी प्लॅनिंग - ८ ऑक्टोबर
मास्टर्स ऑफ एज्युकेशन- ८ ऑक्टोबर
बॅचलर ऑफ एज्युकेशन आणि मास्टर्स ऑफ एज्युकेशन (तीन वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स)-८ ऑक्टोबर
बॅचलर ऑफ लॉ (पाच वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) - ८ ऑक्टोबर
बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन - ८ ऑक्टोबर
बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन- (फिजिकल टेस्ट)- ९, १० , ११ आणि १२ ऑक्टोबर
एमएचटी सीईटी परीक्षा सुरळीत
२० सप्टेंबरपासून एमएचटी सीईटी परीक्षांना सुरळीत सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक केंद्रावर विद्यार्थ्यांनी कोरोनाचे नियम पाळत, सुरक्षिततेचे आणि सामाजिक अंतराचे भान ठेवत ही परीक्षा दिली. १ ऑक्टोबरपर्यंत ही परीक्षा सुरु राहणार आहे.