मुंबई : मागील सहा महिन्यांपासून मुंबईत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ६९ टक्के नागरिकांनी लस घेतली आहे. लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने लस देण्याच्या वेळेत बदल केला आहे. यापुढे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे तर दुसऱ्या दिवसाच्या लसीकरणाची माहिती दररोज सायंकाळी समाज माध्यमांतून जाहीर केली जाणार आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ५२ लाख ५६ हजार १४६ नागरिकांनी पहिला तर १६ लाख ५३ हजार ४२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. पालिका, सरकारी आणि खासगी अशा ४२३ लसीकरण केंद्रांवर लस दिली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लसीकरणाची वेळ नागरिकांना कळविली जाते. मात्र, लसीकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्व शासकीय आणि महापालिका केंद्रांची सकाळी ९ ते सायंकाळी ५ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक आघाडीवर
ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे १ मार्चपासून मुंबईत प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत नऊ लाख ८७ हजार ७८२ ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस तर पाच लाख ९२ हजार ७०७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.