मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) अर्थात पीएसआय पदाच्या भरतीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, इथून पुढे पीएसआय पदाची मुलखात देण्यासाठी शारीरिक चाचणीत ६० गुण मिळविणे आवश्यक असणार आहे. आयोगाच्या या निर्णयाचे अनेक विद्यार्थ्यांमधून स्वागत करण्यात आले असून, आयोगाने विचारपूर्वक हा निर्णय घेतला असल्याच्या प्रतिक्रिया एमपीएससी उमेदवार देत आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीच्या मानकांमध्ये बदल करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्यानुसार हे बदल केल्याचे आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. हे नवे नियम २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी लागू असणार आहेत. त्याच्या शारीरिक चाचणी परीक्षा येत्या सप्टेंबरमध्ये आयोजित केल्या जाण्याची शक्यता आहे. याआधी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता ते शारीरिक चाचणीचे गुण अंतिम गुणवत्ता यादीतून वगळले असून अंतिम निवडीसाठी या गुणांचा विचार केला जाणार असल्याचे ही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.हे निकष त्या विद्यार्थ्यांसाठी लागू होणार का ?महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे २०१९ साली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी (पीएसआय) पूर्व व मुख्य परीक्षा झाली. मात्र, अद्यापही शारीरिक चाचणी झालेली नाही. या उमेदवारांनी मेहनतीने परीक्षा दिल्या आणि शारीरिक चाचणीसाठी सराव सुरू आहे. मात्र, लेटलतिफ कारभारामुळे शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याच्या प्रतिक्रिया उमेदवार देत आहे. त्यात आता हे नवीन निकष या विद्यार्थ्यांच्या पुढील म्हणजे २०२१ मधील शारीरिक चाचणीला लागू असणार का, हे अद्याप आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले नाही. आयोगाचा निर्णय चांगला असला तरी विद्यार्थ्यांचा हा गोंधळ त्यांनी दूर करावा, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे यांनी केली आहे.
असे असणार प्रकारानुसार गुणपुरुष उमेदवारांकरिता : गोळाफेक : वजन ७.२६० कि.ग्रॅ. - कमाल गुण - १५, पुलअप्स : कमाल गुण - २०, लांब उडी : कमाल गुण - १५, धावणे : (८०० मीटर) - कमाल गुण - ५० महिला उमेदवारांकरिता : गोळाफेक : वजन ४ कि.ग्रॅ. - कमाल गुण - २०, धावणे : (४०० मीटर) - कमाल गुण - ५०, लांब उडी : कमाल गुण - ३०