मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावरून धाोवणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. १० ऑक्टोबरपासून नव्या वेळेनुसार रेल्वेगाड्या धावतील. यात सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, तिरुवनंतपुरम-एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस, मडगाव-एलटीटी एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे.
सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस सीएसएमटी येथून रविवारपासून रात्री ११.०५ ऐवजी रात्री ११ वाजता सुटेल. मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस सीएसएमटीला रविवारपासून रात्री ११.३० ऐवजी रात्री ११.५५ वाजता पोहोचेल. मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस रविवारपासून रात्री ११.५५ ऐवजी रात्री १२.२० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. नेत्रावती एक्स्प्रेस एलटीटीला रविवारपासून दुपारी ४.४६ ऐवजी सायंकाळी ५.०५ वाजता पोहोचणार आहे.
एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस रविवारपासून सायंकाळी ६.१५ ऐवजी सायंकाळी ६.५० वाजता एलटीटीला पोहोचेल. मडगाव-एलटीटी एक्स्प्रेस सोमवारपासून एलटीटी येथे रात्री ११.२५ ऐवजी रात्री ११.३५ वाजता पोहोचणार आहे.
करमळी-एलटीटी वातानुकूलित सुपरफास्ट एक्स्प्रेस ५ ऑक्टोबरपासून एलटीटी येथे रात्री ११.२५ ऐवजी रात्री ११.३५ वाजता पोहोचेल. रोहा-दिवा मेमू रविवारपासून दुपारी ४.१५ ऐवजी दुपारी ४.४० वाजता रोह्यावरून सुटेल. सीएसएमटी-मंगळुरू एक्स्प्रेस सीएसएमटी येथून रविवारपासून रात्री १०.०२ ऐवजी रात्री ९.५४ वाजता सुटेल. तसेच एलटीटीवरून उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली असून याची नाेंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
नवीन वेळापत्रक १० ऑक्टोबरपासून लागू
दरवर्षी रेल्वेतर्फे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येते. नवीन वेळापत्रकात नवीन मार्गावर गाड्या सुरू करण्यात येतात, तर काही मार्गांवरील गाड्यांची संख्या वाढविण्यात येते, याशिवाय काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येताे. त्यानुसार मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांच्या वेळेत बदल केला जाणार आहे. हा बदल १० ऑक्टोबरपासून लागू करण्यात येईल.