Join us

पालिका रुग्णालयांच्या ओपीडी वेळांमध्ये बदल; नाव नोंदणी सकाळी ७ वाजता, तपासणी तासाभरात सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 09:37 IST

महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मुंबईकर रोज सकाळी बाह्य रुग्ण विभागात रुग्ण रांगा लावून बसलेले असतात.

मुंबई : सध्याच्या काळात खासगी रुग्णालयात आणि क्लिनिकमध्ये उपचार परवडत नसल्याने सामान्य मुंबईकरांची मदार ही मुख्यत्वे  मुंबई महापालिकेची रुग्णलयावर असते. महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मुंबईकर रोज सकाळी बाह्य रुग्ण विभागात रुग्ण रांगा लावून बसलेले असतात. अनेकदा उपचार घेण्यासाठी अर्धावेळ त्यांना रुग्णालयात घालवावा लागतो. त्यामुळे पेशंटच्या रांगा कमी व्हाव्यात आणि त्यांना जास्त वेळ ताटकळत बसावे लागू नये म्हणून ओपीडीच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रुग्णांची नोंदणी सकाळी सात वाजता आणि आणि तपासणीची वेळ आठ वाजता करण्यात आली आहे. 

डॉक्टरांची ओपीडीमध्ये येण्याची जी वेळ असते. त्यावेळी सर्व वरिष्ठ डॉक्टर येतील याची अनेक वेळा खात्री नसते. अनेक वेळा कनिष्ठ डॉक्टर रुग्णांची तपासणी करून त्यांना वरिष्ठ डॉक्टरांचे मत घेण्यासाठी थांबवून ठेवण्याचे सर्रास प्रकार पाहायला मिळत होते. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ओपीडी वेळा बदलण्याचे पाऊल उचलले आहे.

डॉक्टरांची हजेरी तपासणार :

विभागातील सर्व डॉक्टरांना उपस्थिती दर्शविण्यासाठी बायोमेट्रिकद्वारे हजेरीची नोंद होते. त्यामुळे आता डॉक्टर ओपीडीमध्ये किती वाजता येतात आणि जातात  या बायोमेट्रिकद्वारे प्रशासनाचे लक्ष असणार आहे. 

 महानगरपालिकेत ४ वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालये आहेत.  दिवसभरात १५ हजारांपेक्षा अधिक रुग्ण या रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये दिवसाला उपचार घेण्यासाठी येत असतात. रुग्णालयातील ओपीडीच्या वेळा बदलण्यात आल्या असून वेळेपेक्षा एक तास अगोदर ओपीडी आणि केस पेपर नोंदणी करण्यात येणार आहे.

उपचार घेण्यासाठी फार काळ खर्ची त्यांना घालवावा लागतो. मोठ्या रांगा लागतात. त्यासाठी  ओपीडीची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार लवकर मिळतील आणि जास्त वेळ रुग्णालयात घालवावा लागणार नाही. सकाळी सातला रुग्णांची नोंदणी होऊन आठ वाजता तपासणीस सुरुवात होणार आहे. याकरिता सर्व डॉक्टरांनी त्याच्या ओपीडी काळात हजर राहणे गरजेचे आहे.   - डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य)

टॅग्स :मुंबईनगर पालिकाहॉस्पिटल