Join us

मुंबईत ‘बेस्ट’ची कोंडी; जलवाहिनी, खोदकाम, उड्डाणपुलांच्या कामांमुळे मार्गांमध्ये बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 11:00 AM

मुंबईत सध्याच्या सुरू असलेल्या जलवाहिन्यांचे काम, नालेसफाई, रस्त्यांची डागडुजीची यामुळे प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.

मुंबई :  मुंबईत सध्याच्या सुरू असलेल्या जलवाहिन्यांचे काम, नालेसफाई, रस्त्यांची डागडुजीची यामुळे प्रचंड  वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे ‘बेस्ट’चीही कोंडी होत असून बसच्या अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. परिणामी इच्छितस्थळी जाण्यासाठी प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. शिवाय बेस्ट उपक्रमालाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

महत्त्वाच्या रस्त्यांवरील पुलांचे पुनर्बांधकाम, दुरुस्त्यांमुळे बेस्ट बसला फटका बसला आहे. या कामामुळे अंधेरीतील गोखले पूल, रे रोड पूल, कर्नाक पूल आणि घाटकोपर येथील लक्ष्मी नाला पूल हे पूल चार ते पाच वर्षांपासून बंद आहेत. बेस्ट मार्ग उपक्रमाकडून वळविण्यात आले आहेत. अनेक वेळा बदललेल्या मार्गाची माहिती देण्यात आली तरी अनेक प्रवासी अनभिज्ञ असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  प्रवास मार्गात बदल झाल्याने बेस्ट उपक्रमाच्या दैनंदिन अंतरात वाढ होऊन आर्थिक फटका बसत आहे.

गोखले उड्डाणपूल-

अंधेरी येथील गोखले उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही बेस्टचे अनेक मार्गात बदल केलेले नाहीत. बस क्रमांक ए १८०, २९० मर्यादित, ए ३५९, २५५ हे बस मार्ग जोगेश्वरी उड्डाणपुलावरून नेले. बस क्रमांक ५३३ मर्यादित हा अंधेरी पश्चिमऐवजी पूर्वेकडे खंडित करावा लागला आहे. बस क्रमांक ४२२ हा मार्ग मिलन सब-वे उड्डाणपुलावरून पश्चिमेकडे न्यावा लागला आहे. बस क्रमांक ३२८, ३३६ व १८२ हे बस मार्ग पूर्ण बंद करावे लागले आहेत.

भायखळा फ्लायओव्हर-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील भायखळा फ्लायओव्हरच्या कामासाठी डाऊन दिशेने अवजड वाहनांसाठी बंद केल्यामुळे बसमार्ग क्र. सी १, ४ मर्यदित, ए ५, ६ मर्यादित, ७ मर्यादित, ८ मर्यादित, ९ मर्यादित, ११ मर्यादित १५, ए २१, ए २५, सी ५१ ६७, ६९ बसगाड्या डाऊन दिशेने जाताना भायखळा फ्लायओव्हरवरून न जाता फ्लायओव्हरच्या खालून जाणार आहेत. यामुळे प्रवाशांचा अधिक वेळ खर्च होणार आहे.

सायन पुलाचे पाडकाम हाती घेतल्यानंतर बेस्टच्या २० ते २२ बसना फटका बसणार आहे. या पुलावरून जाणाऱ्या बसचा मार्ग बदलण्यात येणार आहे. 

१) कर्नाक बंदर पूल बंद असल्याने बस क्रमांक ४१ बंद करावा लागला आहे. 

२) बस क्रमांक ए २६ बस जीपीओमार्गे वळवावी लागली आहे, तर रे रोड उड्डाणपूल पूर्णपणे तोडून नव्याने बांधकाम सुरू असल्यामुळे बस क्रमांक १६८ व ६० या दोन बसना कॉटन ग्रीनला मोठा वळसा घालून जावे लागत आहे.

३)   छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने घाटकोपर-गारुडिया नगरहून शिवाजीनगरकडे जाणारी ए-४०४ बसला घाटकोपर आगार येथील उड्डाणपुलापर्यंत वळसा घालावा लागत आहे. 

४) ओशिवरा नाल्यावरील पूल कमकुवत झाल्यामुळे गेली अनेक वर्षांपासून बंद असल्याने ४ मर्यादित, ८४ मर्यादित, ए-२०२, २०३, ए-३५९, २९० मर्यादित आणि ए-२५६ या बसगाड्यांना रिलीफ मार्गाने ओशिवरा आगार बेस्ट नगरमार्गे पुन्हा स्वामी विवेकानंद मार्गाकडे वळसा घालावा लागत आहे.

टॅग्स :मुंबईबेस्ट