Join us

मुंबईतील १४८ प्रभागांच्या लक्ष्मणरेषेत बदल; भाजपाला फटका बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:33 PM

पालिकेने प्रकशित केलेल्या मसुद्यामध्ये आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. तसेच कलम १९ (१) (ए) नुसार बेकायदा आहे असा आरोप भाजपाने केला आहे.

मुंबई :  महापालिकेने २३६ प्रभागांच्या सीमांकन आराखड्यावर हरकती व सूचना मागविल्या होत्या. मात्र या प्रभाग पुनर्रचनेत विद्यमान २२७ प्रभागांपैकी जवळपास १४८ प्रभागांच्या सीमारेषा बदलण्यात आल्या आहेत. तर एकूण १६९ प्रभागांतील काही भाग अन्य प्रभागांशी जोडण्यात आले असल्याचे अहवाल भाजपने तयार केला आहे. ही बाब पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निदर्शनास आणण्यात आली आहे. त्यामुळे प्रभागरचनेवरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. पालिकेने केलेल्या प्रभाग पुनर्रचनेमुळे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या जुन्या प्रभागांमध्ये बदल झाले आहेत. या सर्व फेररचनेचा अभ्यास करीत भाजपने अहवाल तयार केला आहे. 

पालिकेने प्रकशित केलेल्या मसुद्यामध्ये आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. तसेच कलम १९ (१) (ए) नुसार बेकायदा आहे. राजकीय फायद्यासाठी प्रभागाचे विभाजन केला जात आहे. यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन मतदानाची टक्केवारी कमी होईल. - प्रभाकर शिंदे, भाजपचे गटनेते  

असे आहेत आक्षेप... 

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रभागरचना उत्तरेकडून इशान्येला आणि पूर्वेकडून पश्चिमेला, अखेरच्या टप्प्यात दक्षिणेला करणे आवश्यक होते. मात्र मुंबईच्या उत्तर दिशेपासून प्रभाग रचना करण्यात आली आहे. प्रभागरचना करताना मुख्य रस्ते, रेल्वे मार्ग, नाला आदी विचारणे घेणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात काही प्रभाग पालिकेच्या दोन विभाग कार्यालयांच्या हद्दीत विभागले गेले आहेत. काही झोपडपट्टी, चाळी आणि इमारतीही अशाच विभागल्या गेल्या आहेत. जुना प्रभाग क्र. २९ मालाड (पी / उत्तर), कांदिवली (आर / दक्षिणमध्ये) विभागला आहे. प्रभाग ३६चे काही भाग मालाड पी / उत्तर प्रशासकीय प्रभागाचा भाग होते. ते आता जुना प्रभाग क्रमांक २९ मध्ये स्थलांतरित झाले आहेत. 

इमारत दोन प्रभागांत प्रभाग क्र. ३१ मध्ये डीपी किंवा मोठा नाला नैसर्गिक सीमा मानण्याऐवजी एक अरुंद गल्ली सीमा म्हणून घेतली आहे. एक इमारत दोन प्रभागांत विभागली आहे. प्रभाग १६४ चार विधानसभा मतदारसंघात विभागला आहे. ४४ क्रमांकाचा प्रभाग ४३ मध्ये गेला आहे. प्रभागातील सोसायट्या स्वतंत्र प्रभागात विभागल्या आहेत. चार बूथ प्रभाग ३८ मध्ये, तर १० बूथ प्रभाग ४३ मध्ये गेले आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशिवसेनाभाजपा