मुंबई : महावितरणनेवीज चोरांविरुद्ध मोहीम सुरु केली असून वीजचोरांवर कायदेशीर कारवाई करून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे. तसेच ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊन विजेचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.भांडूप परिमंडलातील मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी मीटरशी छेडछाड करणे किंवा मीटर बायपास करणे तसेच वीजतारांवर थेट आकडे टाकून वीजचोरी करणे किंवा रिमोटद्वारे वीज चोरी करणे, असे अनेक प्रकार आढळून आले आहेत. काही ठिकाणी स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीज चोरीचे प्रकार घडत असल्याचे आढळून आले आहेत. अशाच एका प्रकरणात जोडणी महावितरणच्या तंत्रज्ञ व स्थानिक ठेकेदार यांनी जोडून दिल्याचे निदर्शनास आले.परिणामी महावितरणचे महसुली नुकसान झाल्यामुळे व कर्मचाऱ्याने गैर कृत्य केल्यामुळे त्याला कंपनीच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या पुढे वीजचोरीच्या प्रकरणात कोणत्याही वीज कर्मचाऱ्याचा सहभाग असल्यास जबाबदार कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. वीज चोरी करणाऱ्यांबाबत माहिती देणाऱ्याला रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात येईल. माहिती देणाऱ्याचा तपशील गोपनीय ठेवला जाईल.