मुंबई : शाश्वत व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा करण्यासाठी सध्याच्या वीज यंत्रणा व त्याच्या व्यवस्थापनामध्ये होणारे बदल पाहता विजेच्या नियम व विनियमनातही अनुषंगिक बदल करणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय व राज्य वीज नियामक आयोगाकडून संयुक्तरीत्या महाराष्ट्रातील सर्व वीज कंपन्यांसोबत महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी नव्याने बनविण्यात येणाऱ्या नियम व विनियमामध्ये महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्याची दखल घेत महावितरणने केलेल्या सूचनांचे आयोगाने स्वागत केले.देशाच्या प्रगतीमध्ये वीज क्षेत्राचे स्थान महत्त्वाचे असून, गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात सरासरी ६ टक्के वाढ झाली आहे. या क्षेत्रात झालेल्या तंत्रज्ञानातील शोधकार्यामुळे पारंपरिक वीजनिर्मितीबरोबरच अपारंपरिक वीजनिर्मितीमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. देशात महाराष्ट्र राज्य हे वीज क्षेत्रात अग्रणी असून, मागील काही वर्षांत महावितरणने यामध्ये सकारात्क बदल करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या दोन विनियमांबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे औचित्य साधत महावितरणने गेल्या तीन वर्षांत विविध ग्राहकोपयोगी सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत.
वीज क्षेत्रातील नियम व विनियमनात होणार बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 5:52 AM