आॅनस्क्रीन मार्किंग पद्धतीत होणार बदल, मुंबई विद्यापीठ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 07:28 AM2018-09-29T07:28:44+5:302018-09-29T07:28:59+5:30

मुंबई विद्यापीठाकडून आॅनस्क्रीन मार्किंग पद्धतीचा अवलंब निकालासाठी करण्यात आला आणि त्यावरून झालेला गोंधळ, निकालाला लागलेला उशीर, विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान यामुळे मुंबई विद्यापीठावर बरीच टीका झाली.

 Changes to the screening process will be done by the University of Mumbai | आॅनस्क्रीन मार्किंग पद्धतीत होणार बदल, मुंबई विद्यापीठ

आॅनस्क्रीन मार्किंग पद्धतीत होणार बदल, मुंबई विद्यापीठ

googlenewsNext

मुंबई  - मुंबई विद्यापीठाकडून आॅनस्क्रीन मार्किंग पद्धतीचा अवलंब निकालासाठी करण्यात आला आणि त्यावरून झालेला गोंधळ, निकालाला लागलेला उशीर, विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान यामुळे मुंबई विद्यापीठावर बरीच टीका झाली. मात्र मुंबई विद्यापीठ अजूनही ओएसएम प्रणालीवर ठाम असून आता त्यामध्ये मुंबई विद्यापीठाकडून काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांचे प्रशिक्षण मुंबई विद्यापीठाशी संलग्नित ७५० महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि प्राचार्यांना देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळास कारणीभूत ठरलेल्या आॅनलाइन मूल्यांकनाच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत.
सर्व विद्याशाखेतील उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन जलदगतीने होऊन निकाल लावण्यासाठी, परीक्षा पद्धतीमध्ये अधिक पारदर्शकता, मूल्यमापनाची विश्वासार्हता वाढावी आणि मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी आॅनस्क्रीन मार्किंग पद्धतीचा अवलंब मुंबई विद्यापीठाने केला. आता ही ओएसएम प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी या प्रणालीत काही बदल केले आहेत. ४ आॅक्टोबर २०१८ पासून द्वितीय सत्र म्हणजेच हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरू होत आहेत.
सदर परीक्षासाठी संगणकाधारित प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी या प्रणालीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. या बदलाची माहिती देण्यासाठी ७५० महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व आयटी समन्वयक यांना या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी रत्नागिरी, रायगड, मुंबई व पालघर येथे २९ सप्टेंबरपासून प्रशिक्षण आयोजित केले आहे.

उत्तरपत्रिकेत बदल करण्याचा निर्णय

द्वितीय सत्र २०१८ पासून मुंबई विद्यापीठाने, विद्यार्थ्यांची परीक्षेतील उपस्थिती मॅन्युअल पद्धतीने करण्याऐवजी संगणकीय उपस्थिती करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच उत्तरपत्रिकेमध्ये बदल करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेसाठी देण्यात येणाऱ्या स्टिकरवर विद्यार्थ्यांच्या आसन क्रमांकाबरोबर विषयाचा कोड, परीक्षेचे नाव आणि विद्यार्थ्यांचा फोटो अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर ‘दिव्यांग’ हा रबरी स्टॅम्प कशा पद्धतीने मारण्यात यावा याचे प्रशिक्षणही या दरम्यान देण्यात येईल. विद्यापीठाने शिक्षकांसाठीदेखील मोबाइल अ‍ॅप तयार केलेले आहे. या मोबाइल अ‍ॅपद्वारे शिक्षकास कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत याचा समावेश प्रशिक्षणामध्ये असणार आहे. सदर प्रशिक्षण परीक्षा विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे हे स्वत: देणार असून यातील काही ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर हे स्वत: उपस्थित राहतील.

Web Title:  Changes to the screening process will be done by the University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.