Join us

राजधानी' प्रमाणे धावणाऱ्या गाड्यांचे तिकीट आरक्षणात बदल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 7:03 PM

आरक्षण कालावधी ३० दिवसांचा

 

मुंबई : भारतीय रेल्वने काही  प्रमुख निवडलेल्या मार्गावर 'राजधानी' प्रमाणे प्रवासी रेल्वे चालवीत आहेत.  मात्र या विशेष रेल्वेच्या तिकीट आरक्षणामध्ये अनेक नियम आणि अटी होत्या. मात्र रेल्वे प्रशासनाने यात सुधारणा केली आहे. प्रवाशांना या रेल्वेचे आगाऊ आरक्षण कालावधी ७  दिवसांवरून वाढवून आता ३० दिवस करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या रेल्वेचे आरक्षण  करण्यासाठी दिलासा मिळणार आहे.

भारतीय रेल्वे रेल्वे सेवा सुरळीत सुरु करण्यासाठी आणि देशभरात अडकलेल्या नागरिकांना प्रवास करता यावा, यासाठी १२ मेपासून ३० विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार  पहिल्या टप्प्यात देशातील १५  वातानुकूलित ट्रेनच्या ३० फेऱ्या सुरु केल्या आहे. या ट्रेन नवी दिल्लीहुन मुंबई सेंट्रल, डिब्रूगड,आगरतला, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, अहमदाबाद आणि जम्मू तवीला या शहरासाठी या गाड्या धावत आहे.सुरुवातीला या गाडयांचे आगाऊ तिकीट आरक्षित करण्यासाठी  ७  दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना तिकीट आरक्षण करताना अडचणी येत होत्या. 

मात्र आता रेल्वेने तिकीट आरक्षणाचा आणि अन्य नियम बदल केले आहे. या गाड्यांचा आरक्षण कालावधी ७ दिवसांवरून वाढवून आता ३०  दिवस करण्यात येणार आहे . यासह लागू असलेल्या नियमांनुसार या गाड्यांची आरएसी/प्रतीक्षा यादी तिकिटे दिली जातील.  प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना या गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही. या रेल्वेचा पहिली यादी ट्रेन सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या कमीत कमी ४ तास आधी आणि दुसरी यादी ट्रेन सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या किमान २ तास आधी तयार होईल. पूर्वी हि यादी ३०  मिनिटे आधी तयार व्हायची.  पहिली आणि दुसरी यादी  दरम्यान चालू (करंट) आरक्षण करण्याची परवानगी दिली जाईल. ट्रेनमधील आरक्षणासाठी वरील बदलांची अंमलबजावणी २४ मे पासून होणार आहे. ३१  मे रोजी किंवा त्यानंतर सुरू होणार्‍या गाड्यांना हे लागू होईल.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस