गुढीपाडवा शोभायात्रेनिमित्त वाहतुकीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:27 AM2018-03-17T02:27:32+5:302018-03-17T02:27:32+5:30
अवघ्या २४ तासांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्यासाठी सर्वसामान्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नववर्षानिमित्त शहरांच्या विविध भागांत शोभायात्रा आणि मिरवणुका काढल्या जातात.
मुंबई : अवघ्या २४ तासांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्यासाठी सर्वसामान्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नववर्षानिमित्त शहरांच्या विविध भागांत शोभायात्रा आणि मिरवणुका काढल्या जातात. यामुळे संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. आपत्कालीन सेवेतील वाहनांना वगळून अन्य सर्व वाहनांना हे नियम लागू असल्याचे वाहतूक पोलीस उपआयुक्त अशोक दुधे यांनी स्पष्ट केले.
गिरगाव येथील सी.पी. टँक सर्कल ते प्रार्थना समाज जंक्शनपर्यंतचा मार्ग रविवारी सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंच्या वाहतुकीकरिता आणि वाहनांच्या पार्किंगसाठी बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहनांना आर.आर. रोड मार्गे येथून उजवे अथवा डावे वळण घेत एस.व्ही.पी. रोडवरून आपल्या इच्छित स्थळी जाता येईल.
चर्नी रोड येथील आर.आर. रोड-एस.व्ही.पी. रोड ते एम.के. रोड मार्ग सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी आणि सर्व प्रकारच्या वाहनांच्या पार्किंंगसाठी बंद राहणार आहे. या मार्गावरील एस.व्ही.पी रोडवरून डावे आणि उजवे वळण घेत इच्छित स्थळी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बी.जे. रोड-एम.के. रोड जंक्शन ते खत्तर गल्लीपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. जे.एस.एस. रोड-एस.व्ही. रोड जंक्शन ते श्यामलदास गांधी मार्गपर्यंतचा मार्ग शोभायात्रेदरम्यान बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून जे.एस.एस. रोड, आॅपेरा हाउस जंक्शन येथून (दक्षिण वाहिनी) जे.एस.एस. रोडकरिता जाणारी वाहने एम.के. रोडकरिता सरळ मार्गे आणि जे.एस.एस. रोड अल्फ्रेड जंक्शन (उत्तर वाहिनी) येथून जे.एस. रोडकरिता जाणारी वाहने अल्फ्रेड जंक्शन येथून डावे वळण घेत एम.के. रोड मार्गे प्रवास करू शकतात.