लोअर परळ येथील वाहतूक व्यवस्थेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 06:53 AM2018-05-31T06:53:59+5:302018-05-31T06:53:59+5:30
१ ते १५ जूनपर्यंत प्रयोग; वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न
मुंबई : मुंबई शहरातील सर्वाधिक वाहनांची वर्दळ असलेल्या लोअर परळ परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जून ते १५ जून या कालावधीत वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात येईल.
कॉर्पोरेट कार्यालय आणि बहुतांशी माध्यमांची कार्यालये लोअर परळ भागात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून लोअर परळमध्ये स्थानिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील भारतामाता सिनेमा जंक्शन येथून महादेव पालव मार्गाने शिंगटे मास्तर चौकाकडे जाणाऱ्या बेस्ट बससह सर्व वाहतूक एक दिशा करण्यात आली आहे. सेनापती बापट मार्गावरील संत रोहिदास चौक येथून परेल टीटी जंक्शनकडे जाणारी वाहतूक एक दिशा करण्यात आली आहे.
वाहन चालकांच्या मार्गदर्शनासाठी दिशादर्शक जागोजागी उभारण्यात आले आहेत. याचबरोबर, प्रवाशांच्या मदतीसाठी आवश्यक तेथे मनुष्यबळ तैनात करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. १ जूनपासून लागू होणाºया बदलाबाबत प्रवाशांना हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, ८७ सर पोचखानवाला रोड, वरळी या पत्त्यावर पत्र पाठविण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.
या मार्गाने प्रवास करा
परेल टीटी जंक्शन येथून संत रोहिदास चौकाकडे जाणारी वाहतूक परेल टीटी येथून डॉ. आंबेडकर मार्गाने भारतमाता सिनेमा-महादेव पालन मार्ग-
शिंगटे मास्तर चौक-एनएम जोशी मार्गाने सेनापती बापट मार्गाने संत रोहिदास चौक येथे येतील.
शिंगटे मास्तर चौककडून सिनेमा जंक्शनकडे जाणारी वाहतूक सेनापती बापट मार्गे संत रोहिदास चौक येथून उजवे वळण घेत, एल्फिन्स्टन पुलावरून परेल टीटी जंक्शन येथे जाईल.
शिंगटे मास्तर चौक येथून भारतमाता जंक्शनकडे जाणारी वाहतूक एनएम जोशी मार्गाने डावे वळण घेत, सानेगुरुजी मार्गाने संत जगनाडे महाराज चौकातून डावे वळण घेत भारतमाता जंक्शनकडे जाता येईल.