बिरवाडी : बारा बलुतेदारांपैैकी एक कुंभार व्यवसाय हा माती उत्खननाच्या शासनाच्या बंदीमुळे अडचणीत सापडला आहे. त्यातच या व्यवसायाबाबत असलेली लोकप्रतिनिधींची उदासीनता व बदलत्या जीवनशैलीचा पारंपरिक व्यवसायाला फटका बसत आहे. मातीपासून कोने बनविणे हा पारंपरिक व्यवसाय सिमेंटच्या व पत्र्याच्या घरांच्या बांधणीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बिरवाडी कुंभारवाडा येथील शंकर खैरकर व सुरेखा खैरकर हे दांपत्य पारंपरिक व्यवसाय करीत आहेत. पूर्वी मातीच्या कोन्यांना खूप मोठी मागणी होती. मात्र अत्याधुनिक निवासस्थानाच्या पद्धतीमुळे या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. पूर्वीसारखी मागणी नसल्याने या कुटुंबीयांना अन्य ९ महिने उदरनिर्वाहासाठी पर्यायी कामकाज करावे लागते. काही वर्षांपूर्वी संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह या पारंपरिक व्यवसायामधूनच होत असल्याचे शंकर खैरकर यांनी सांगितले. वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय फेब्रुवारी ते मे असा ३ महिन्यांचा कालावधीत केला जातो. यापूर्वी मातीचे कोने बनविण्याचे ५ ते ६ व्यवसाय बिरवाडी, कुंभारवाडा परिसरात कार्यरत होते. परंतु आज शंकर खैरकर यांचा एकमेव व्यवसाय सुरू आहे. हा व्यवसाय त्यांच्यानंतर त्यांची मुले करतीलच असे नाही. त्यामुळे हा पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वाढत्या महागाईमुळे हा व्यवसाय करणे अवघड झाले असल्याचे खैरकर यांचे म्हणणे आहे. सिंमेट पत्र्यांच्या निवासस्थानामुळे त्याचप्रमाणे आरसीसी घरनिर्मिती यामुळे या व्यवसायाला फार मोठी मागणी नसल्याने व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. (वार्ताहर)
बदलत्या जीवनशैलीचा कुंभार व्यवसायाला फटका
By admin | Published: May 03, 2015 10:49 PM