Join us

बदलती जीवनशैली कर्करोगाला कारण

By admin | Published: February 04, 2016 2:51 AM

आजूबाजूचा परिसर आणि जीवनशैलीमुळे कर्करोग होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनुवंशिकतेमुळे कर्करोग होतो, पण त्याचे प्रमाण कमी आहे.

पूजा दामले,  मुंबईआजूबाजूचा परिसर आणि जीवनशैलीमुळे कर्करोग होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनुवंशिकतेमुळे कर्करोग होतो, पण त्याचे प्रमाण कमी आहे. खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी, ताण, व्यायाम न करणे याचा परिणाम नकळतपणे पेशींवर होत असल्यामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण वाढताना दिसत असल्याचे टाटा रुग्णालयाचे कर्करोग शल्यचिकित्सक प्राध्यापक आणि पचनक्रिया, यकृत, स्वादुपिंड कर्करोग विभागप्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दररोज प्रत्येकाच्या शरीरात कर्करोगाच्या पेशींची वाढ होत असते. मात्र, शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमुळे त्याची वाढ होत नाही. शरीरातून नकळतच कर्करोग निघून जातो. बदलत्या जीवनशैलीमुळे शरीराची जास्त प्रमाणात हानी होते. त्याचा परिणाम पेशींवर होत कर्करोगाच्या पेशींची वाढ होते आणि व्यक्तींना कर्करोग जडतो. काही कर्करोगांचे निदान लवकर झाल्यास ते बरे होऊ शकतात. पण शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करतो अथवा स्वत: उपचार करतो. त्यामुळे आजार बळावतो. हे प्रकार ग्रामीण भागातच नाही, तर शहरी सुशिक्षित व्यक्तीही करतात, असेही डॉ. श्रीखंडे म्हणाले.‘लठ्ठपणा, बद्धकोष्ठता वाढतेय’बद्धकोष्ठतेचा त्रास भारतीयांना होण्याचे प्रमाण कमी आहे. कारण, आहारात पालेभाज्या आणि अन्य गोष्टींचा समावेश असतो. पण गेल्या काही वर्षांत आपण परदेशातील खाद्यसंस्कृती स्वीकारली आहे. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि बद्धकोष्ठताही वाढते आहे. बद्धकोष्ठतेमुळे पोटात कार्सिनोजन वाढते. परिणामी, मोठ्या आतड्याचा कर्करोग होऊ शकतो, हे अनेकांना माहीत नाही. १० वर्षांपूर्वीपर्यंत १ लाखांपैकी ४ ते ५ जणांना मोठ्या आतड्याचा कर्करोग व्हायचा. युरोप, अमेरिकेत याचे प्रमाण ३० ते ३५ इतके होते. पण आता भारतातही हे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. टाटा रुग्णालयातील प्रिव्हेंटिव्ह आॅन्कोलॉजी विभागात कर्करोगावरील प्रतिबंधात्मक उपायांवर काम केले जाते. या विभागात कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी तपासण्या केल्या जातात, त्याचबरोबर संशोधनही केले जाते. या विभागात दरवर्षी पाच ते साडेपाच हजार नवीन व्यक्तींच्या कर्करोगाच्या तपासण्या केल्या जातात, तर १० ते १२ हजार व्यक्तींच्या फॉलोअपच्या तपासण्या केल्या जातात. काही कर्करोगांचे निदान प्राथमिक पातळीवर असताना होणे शक्य नाही, त्यासाठी लागणाऱ्या तपासण्याही उपलब्ध नाहीत. मात्र, मुखाच्या, गर्भाशयाच्या मुखाच्या आणि स्तनाच्या कर्करोगाचे निदान प्राथमिक पातळीवर असताना होणे शक्य आहे. या विभागात मुखाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासण्या केल्या जातात. खासगी रुग्णालयापेक्षा टाटा रुग्णालयात अत्यल्प दरात या तपासण्या केल्या जात असल्याची माहिती टाटा रुग्णालयाच्या प्रिव्हेंटिव्ह आॅन्कोलॉजी विभागाच्या डॉ. गौरवी मिश्रा यांनी दिली. मद्यामुळेही कर्करोगाचा धोका...१मुखाचा, अन्ननलिकेचा कर्करोग हा तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतो. याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. पण अतिमद्यप्राशनामुळेही कर्करोग होण्याचा धोका आहे. २जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च आॅन कॅन्सर’ने मद्यप्राशन कर्करोग होण्याचे एक कारण असल्याचे सिद्ध केले आहे. मुखाचा, अन्ननलिकेचा, यकृताचा आणि आडजिभेच्या कर्करोगास मद्यप्राशन कारणीभूत असल्याची माहिती टाटा रुग्णालयाच्या हेड अ‍ॅण्ड नेक विभागाचे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी दिली. ३देशात सुपारी खाणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. सुपारी, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. अनेक जणांना सुपारीमुळे कोणत्याही प्रकारची हानी होत नाही, असे वाटते. हा मोठा गैरसमज आहे. तंबाखूप्रमाणेच सुपारीही हानिकारक आहे, असेही चतुर्वेदी यांनी सांगितले.राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाबरोबर आम्ही काम करतो. जनजागृतीबरोबरच तळागाळातील लोकांपर्यंत कर्करोगाच्या तपासण्या पोहचाव्यात, यासाठी काही उपक्रम राबविले जातात. यात आम्ही आरोग्य सेविकांना ट्रेनिंग देतो. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांपर्यंत कर्करोगाची तपासणी होऊ शकते. याचबरोबर तंबाखूसेवन कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. बेस्ट आणि भूदलाच्या वसाहतींमध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबियांची तपासणी केली जाणार आहे.- डॉ. एस. एस. श्रीवास्तव, प्रिव्हेंटिव्ह आॅन्कोलॉजी विभाग प्रमुख, टाटा रुग्णालय प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे रोग होण्याआधीचे योजण्याचे उपाय. एखाद्या व्यक्तीला कर्करोगाचे निदान झाल्यावर केले जाणारे उपचार महत्त्वाचे असतात. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसतानाही, त्याने शारीरिक तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. नियमित तपासण्या केल्यास रोगाला प्रतिबंध करता येऊ शकतो. कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी दर दोन ते तीन वर्षांनी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. शरीरात नेहमी बदल होत असतात. म्हणून एकदा तपासणी केल्यावर कर्करोगाची लक्षणे आढळली नसली तरीही पुन्हा तपासणी केली पाहिजे, असे टाटा रुग्णालयाच्या प्रिव्हेंटिव्ह आॅन्कोलॉजी विभागाच्या डॉ. शर्मिला पिंपळे यांनी सांगितले.