मुंबई : मागील काही काळापासून बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि व्यसनाधीनतेचे प्रमाण तरुण पिढीमध्ये वाढले आहे. परिणामी या पिढीत हृदयविकाराचा धोका असल्याचे दिसून येते. हृदयाला शुद्ध रक्तपुरवठा करणारे स्वत:चे जाळे असते. या रक्तवाहिन्यांच्या जाळ्य़ामधून हृदयास साखर, प्राणवायू व इतर आवश्यक घटक प्रत्येक भागात पोहोचतात. ज्या वेळी या रक्तवाहिन्यांची रुंदी कमी होते किंवा पूर्णपणे बंद होते त्या वेळी हृदयाच्या इतर भागात शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही आणि हृदयविकाराचा झटका येतो, अशी माहिती हृदयविकार तज्ज्ञांनी दिली आहे.
हृदयविकार तज्ज्ञ अशोक जैन यांनी सांगितले की, जर श्रमानंतर दम लागत असेल किंवा खूप थकवा येत असेल तर काळजी घ्यायला हवी. तसेच एकदा अँजिओप्लास्टी झाली म्हणून पुन्हा आजार वाढणार नाही, असे गृहीत धरून चालणार नाही. मात्र योग्य आहार-विहार, विचार, व्यायाम, नियमित तपासणी, चाचण्या, उपलब्ध उपचार या सर्व गोष्टी हृदयाघात टाळू शकतात.
आधुनिक जीवनाचा ताण आणि तणाव हा तरुणांमध्ये हृदयविकारासाठी सर्वात जास्त कारणीभूत घटक आहे. तरुणांमध्ये हृदयाची गुंतागुंत टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली, नियमित कसरत पद्धती, अल्कोहोल, तंबाखू किंवा मादक पदार्थांचा गैरवापर टाळणे आणि वार्षिक किंवा सहा मासिक पूर्ण शरीर तपासणी याविषयी जागरूकता निर्माण करण्याची नितांत गरज आहे, अशी माहिती हृदय रोग विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. लेखा पाठक यांनी दिली आहे.
याकडे लक्ष द्या
खूप काळ तणाव असल्यास तुमचा रक्तदाब वाढून तुमच्या हृदयावर परिणाम होऊन ताणही येतो. त्यामुळे ताणतणावाचे योग्य वेळी व्यवस्थापन करा. योगासने आणि श्वसनाचे व्यायाम केल्यानंतर हा तणाव कमी होतो. आनंदी ठेवणारे छंद जोपासायला हवेत. नियमित व्यायामामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. त्यामुळे त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे चालणे. हृदयविकारास कारणीभूत ठरणारे मुख्य घटक म्हणजे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह या तिन्ही विकारांना प्रतिबंध करण्यासाठी वेगात चालणे हा उत्तम उपाय आहे. संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे हृदयातील रक्तवाहिन्यांचा विकार न होण्यास मदत होते.