मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन अशी मुंबई ते दिल्ली पहिली राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. या एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून राजधानी एक्स्प्रेसचे वेळापत्रक सतत बदलत आहे. यामुळे गोंधळ उडत असून, हे बदलते वेळापत्रक त्रासदायक ठरत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.
मध्य रेल्वे मार्गावरून मुंबई ते दिल्ली पहिली राजधानी एक्स्प्रेस १९ जानेवारीला सुरू झाली. गाडी क्रमांक २२२२२ राजधानी निजामुद्दीनवरून दर आठवड्याला गुरुवारी, तसेच रविवारी सुटते. मात्र, या गाडीतील फलकावर शुक्रवार आणि सोमवार या दिवशी एक्स्प्रेस सुटत असल्याचे दाखविण्यात येते. यामुळे एक्स्प्रेसचे आरक्षण करताना गोंधळ उडत असल्याचा नाराजीचा सूर प्रवाशांमध्ये आहे. सीएसएमटीहून गाडी क्रमांक २२२२१ राजधानी एक्स्प्रेस ही दर बुधवारी आणि शनिवारी दिल्लीसाठी रवाना होते. मात्र, मागील महिन्यापासून दुपारी २.५० वाजता सुटणारी गाडी ४ वाजून १० मिनिटांनी सुटत आहे.प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रयत्नशीलराजधानीला पुश-पूल इंजिन लावून वेग वाढविण्यात येत आहे. त्यानुसार, राजधानी एक्स्प्रेसचे कायमस्वरूपी वेळापत्रक तयार करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासोबतच प्रवाशांना विविध सुविधा देण्यासाठी अनेक प्रयोग सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.