‘दुपार’चा ट्रेंड बदलतोय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:00 AM2017-08-16T01:00:23+5:302017-08-16T01:00:23+5:30

दहीकाल्याच्या दिवशी सकाळी दहीहंड्या बांधून त्या दुपारपर्यंत फोडण्याची प्रथा आता कालबाह्य होत असलेली दिसून येत आहे.

Changing the trends of 'noon' ..! | ‘दुपार’चा ट्रेंड बदलतोय..!

‘दुपार’चा ट्रेंड बदलतोय..!

Next

राज चिंचणकर ।
मुंबई : दहीकाल्याच्या दिवशी सकाळी दहीहंड्या बांधून त्या दुपारपर्यंत फोडण्याची प्रथा आता कालबाह्य होत असलेली दिसून येत आहे. यंदा तर त्यावर शिक्कामोर्तबच झाले. विविध गल्ली-बोळ, चौक आणि रस्त्यांवर आयोजकांकडून बांधण्यात येणाºया दहीहंड्या दोरीवर टांगण्यासाठी अनेकांना दुपार उलटून गेली तरी मुहूर्त सापडला नाही. परिणामी, सकाळपासून हंड्या फोडण्यासाठी उत्साहात निघालेल्या गोविंदा पथकांचे स्वागत अनेक ठिकाणी केवळ टांगलेल्या दोरखंडांनी झाले.
संस्कृती आणि परंपरा जपणारा उत्सव म्हणून दहीकाल्याकडे पाहिले जात असतानाच, या उत्सवाचे स्वरूप वर्षागणिक पार बदललेले दिसून येत आहे. सणाचा ‘इव्हेंट’ करण्याच्या नादात दहीकाल्याची खरी प्रथा विस्मृतीत जाऊ लागली आहे. त्याचे प्रतिबिंब मध्य मुंबईत दादर रेल्वे स्थानक परिसर वगळता, माहीम-दादर परिसरात पडलेले दिसत होते. सकाळपासून नाक्यानाक्यांवर सजवून उभारलेली व्यासपीठेच केवळ दुपारपर्यंत दर्शन देत होती. दुपारनंतर या ठिकाणी आयोजकांचे दर्शन घडत होते, त्यानंतर दोरखंडांवर हंड्या बांधल्या जात होत्या. दहीकाल्याचा उत्सव रात्रीपर्यंत सुरू ठेवण्यासाठी हा सगळा आटापिटा केल्याचे स्पष्ट दिसून येत होते.
दहीहंड्यांना ‘सलामी’ देण्याची प्रथा यंदाही सालाबादप्रमाणे सुरू राहिली आणि त्यामुळे हंडी फुटण्याचे दृश्य अनुभवण्यासाठी सर्वसामान्य नागरिक व बच्चेमंडळींना बराच काळ वाट पाहावी लागत होती.
>सेलीब्रिटींची ‘युवा’ दहीहंडी...
महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयडियलतर्फे यंदाही दादरच्या आयडियल गल्लीत सेलीब्रिटी दहीहंडी बांधण्यात आली होती. ही हंडी फोडण्यासाठी ‘झी युवा वाहिनी’च्या विविध मालिकांतील युवा कलावंत पुढे सरसावले होते. समीर खांडेकर, ओम्कार गोवर्धन, अमृता फडके, प्राजक्ता वाडये, सुषमा कोळे, रचना मिस्त्री, मुग्धा परांजपे, तेजस बर्वे, अभिषेक गावकर, विवेक सांगळे आदी कलावंतांनी दोन थरांचा गोविंदा रचत ही हंडी फोडली. या वेळी या कलावंतांसह ‘सेल्फी’ काढण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.
>मालाडमध्ये व्यसनविरोधी संदेश
मालाड पूर्वेकडील दफ्तरी रोडवरील श्री भगवती भवानी गणेश देवस्थान चौक येथे श्री गणेश प्रताप अखंड सेवा शक्तिपीठ ज्ञासतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात तरुणांना नशेपासून परावृत्त करण्याचा संदेश देण्यात आला. ‘व्यसनामध्ये नशा, निराशा, आळस आणि दारिद्र्य अशा चक्रव्यूहात मनुष्य अडकतो, या चक्रव्यूहातून तरुणांनी बाहेर पडावे,’ असे विविध संदेश या वेळी देण्यात आले.

Web Title: Changing the trends of 'noon' ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.