बदलते हवामान ‘ताप’दायक
By admin | Published: March 5, 2016 02:31 AM2016-03-05T02:31:59+5:302016-03-05T02:31:59+5:30
थंडीचा जोर ओसरल्यानंतर मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. कमाल तापमान थेट ३५ अंशावर पोहोचले आहे; तर किमान तापमान २४ अंशावर दाखल झाले आहे.
मुंबई : थंडीचा जोर ओसरल्यानंतर मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. कमाल तापमान थेट ३५ अंशावर पोहोचले आहे; तर किमान तापमान २४ अंशावर दाखल झाले आहे. वाढते तापमान आणि उकाडा मुंबईकरांचा घाम काढत असतानाच शुक्रवारी सकाळी पडलेल्या अवकाळी पावसाने उकाड्यात आणखीच वाढ झाली असून, दिवसेंदिवस यात भरच पडणार असल्याने मुंबईकरांसाठी उन्हाळा अधिक तापदायक ठरणार आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावरही होताना दिसून येत असल्यामुळे तब्येतीची काळजी घ्या, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
देशाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर ओसरला आहे. परिणामी, मुंबईसह राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. मध्यंतरी विदर्भापासून आसामपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे यात आणखी भर पडली असून, राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शिवाय विदर्भासह मराठवाड्यात गारपिटीचा मारा झाला असून, वातावरणातील हे बदल मुंबईकरांनाही सहन करावे लागत आहेत.
मुंबई शहरात सकाळी पावसाचा जोर अधिक नसला तरी पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. विलेपार्ले, अंधेरी, कांदिवली आणि बोरीवलीमध्ये जोरदार पाऊस झाला. तर कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंडमध्येही पावसाने सकाळी धिंगाणा घातला. ऐन सकाळी ‘पीक अवर’ला दाखल झालेल्या पावसामुळे मुंबई-ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता; शिवाय नोकरीनिमित्त घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे रिक्षा, टॅक्सी आणि बेस्ट बस पकडताना हाल झाले. पावसाच्या टपोऱ्या थेंबांपासून बचाव करण्यासाठी चाकरमान्यांनी बसस्टॉप, दुकानांचे शेड, पुलाखालील जागा अशा अनेक आसऱ्यांचा आधार घेतला होता. सकाळी ११नंतर मात्र पावसाचा जोर ओसरला आणि त्यानंतर वातावरण मोकळे झाल्याने थेट मारा झालेल्या सूर्यकिरणांमुळे मुंबईकरांना अक्षरश: तापदायक उन्हाला सामोरे जावे लागले.
मागील आठवड्याभरापासून मुंबईच्या वातावरणात बदल होऊ लागले आहेत. थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. तर कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे कमाल तापमान थेट ३५ अंशावर दाखल झाल्याने वाढत्या उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पुढील ४८ तासांसाठी अशाच तापदायक वातावरणाला मुंबईकरांना सामोरे जावे लागणार असून, वाढणारा उकाडा मुंबईकरांचा घाम काढणार आहे.
> हवामान शास्त्र विभाग काय म्हणतो?
कमाल तापमान : कोकण-गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
किमान तापमान : कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत तर कोकण गोव्याच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.थंडी असताना उन्हाळा सुरू होण्याच्या या संक्रमण काळात तब्येतीची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. कारण या वेळी विषाणूंची संख्या वाढते आणि त्याचा शरीरावर परिणाम दिसून येतो. या संक्रमणाच्या काळात मध्येच पाऊस पडल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढणार आहे, असे फॅमिली फिजिशियन डॉ. अनिल पाचणेकर यांनी सांगितले. मार्च महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे डोकेदुखी, घसादुखीचे प्रमाण वाढले आहे. पण, संसर्ग वाढल्यास, सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ होते. उन्हाळ्यात धूलिकण हवेच्या वरच्या थरात असतात. तापमान कमी झाल्यास अन्नपदार्थांवर धूलिकण बसतात. . श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. स्वप्निल कुलकर्णी यांनी सांगितले, वातावरणाच्या संक्रमण काळात, दम्याच्या रुग्णांचा त्रास बळावण्याची शक्यता असते. उन्हाळ्यातही त्यांना त्रास होऊ शकतो. या रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.