मुंबई : विक्रोळीच्या केसर बागेत काही जण चरायला लागले आहेत, त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. निवडणुकीत इतके मतदान करा की, त्या मतांच्या ढिगाऱ्यात चंगू-मंगू साफ बुडाले पाहिजेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विक्रोळीतील जाहीर सभेत केली.
विक्रोळी गुंडगिरीमुक्त करण्याची संधी चालून आली आहे. ओरिजनल कोण आणि डुप्लिकेट कोण, हे त्याला समजायला हवे. त्याची निशाणी आग लावण्याची आहे. तुम्ही मला अगदीच हलक्यात घेतले. त्याचे परिणाम दिसत आहेत, असा टोलाही शिंदेंनी लगावला.
रमाबाई नगर येथे घरे बांधण्याचे काम आम्ही केले. एसआरए, जुन्या इमारतींचे रखडलेले प्रकल्प टेक ओव्हर करतोय. बंद असलेले प्रोजेक्ट सुरू केले आहेत. आम्ही कधी सुडाचे राजकारण करत नाही, असे ते म्हणाले.
तुम्ही काय पैशांचा पाऊस पाडणार आहात का?
सरकारच्या योजना सर्व समाजासाठी आहेत. आम्ही कुठलाही भेदभाव करत नाही. आधी आमच्या योजनेला विरोध केला आणि आता तुम्ही म्हणता महिलांना दरमहा ३ हजार देणार. आम्हाला विचारले की पैसे कुठून आणणार? मग, आता तुम्ही पैशांचा पाऊस पाडून पैसे देणार आहात का? असा सवाल शिंदेंनी केला.